पहिलीपासूनच्या शाळांसाठी नियमावलीः वाचा काय करावे आणि काय करू नये याचा सविस्तर तपशील

0
432
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी आणि शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर हे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आज जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तर १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

  • शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात / गावात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  • सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. – कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.
  • विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरु करावेत. कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.
  • शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी/ सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इत्यादींसाठी हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे.
  • संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
  • वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालिका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.
  • १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.
  • १ डिसेंबरपासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा.
  • विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा. वरील मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त शासनाने कोरोनासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचेही पालन करण्यात यावे.

शाळा सुरु करण्यापूर्वीच्या उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे. तापमापक (Thermometer), जंतूनाशक, साबण-पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावे. वापरण्यात येणारे तापमापक हे calibrated contactless infrared digital thermometer असावे. ज्या ठिकाणी वाहतूक सुविधेचा वापर करण्यात येणार आहे अशा शाळांनी मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाखाली वाहतुक आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरीता वाहतुकीसाठी वापरात येत असलेल्या वाहनांचे वेळो-वेळी निर्जंतुकीकरण करावे. एखाद्या शाळेत विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) / कोविड सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थलांतर करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करुन हस्तांतर शाळेकडे करावे.

शिक्षकांची कोरोना चाचणीः  संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोनासाठीची ४८ तासापूर्वीची RTPCR चाचणी करावी. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे. शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची परवानगी देण्यात यावी. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोरोनाबाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी. शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश द्यावा.

बैठक व्यवस्था: वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. बैठक व्यवस्थेमध्ये दोन विद्यार्थ्यां दरम्यान ६ फुटांचे अंतर असावे. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. ४. शारीरिक अंतराच्या नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित कराव्या. शाळेत दर्शनी भागावर Physical distancing, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शित कराव्यात.

थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ इत्यादींचा वापर गर्दी होणारी ठिकाणे, जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादीच्या ठिकाणी करण्यात यावा. शारीरिक अंतर राखण्यासाठी जेथे शक्य असेल तेथे येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात.

शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निर्बंधः परिपाठ, स्नेह संम्मेलन, व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात.

पालकांची संमती व पालकांनी घ्यावयाची दक्षता:  विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या किंवा लक्षण असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये.

कोरोनाबाबतची जागृतीः शाळा सुरु करण्यापूर्वीच विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने पत्रके, पत्रे व सार्वजनिक घोषणांच्या माध्यमांचा वापर करुन पुढील मुद्द्यांबाबत कार्यवाही करावी:

काय करावे किंवा काय करु नये याबाबतच्या सूचनाः  शारीरिक अंतर पालनाचे महत्व, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छताविषयक सवयी,  कोरोनाबाबतच्या गैरसमजुती,  कोरोनाची लक्षणे आढळल्यास शाळेत जाणे टाळणे, मास्कचा वापर करावा, हात सातत्याने साबणाने स्वच्छ करावेत, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सुचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे (कोरोनाच्या अनुषंगाने) अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध-उपचार घेत आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये.

शाळेतील उपस्थितीबाबतचे धोरणः विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमती वर अवलंबून असेल. १००% उपस्थितीबाबत देण्यात येणारी पारितोषिके कोरोना परिस्थितीमुळे सद्य:परिस्थितीत देऊ नये. भविष्यामध्ये कोरोना कोविड परिस्थिती सुधारल्यानंतर नियमित शाळा सुरु झाल्यानंतर अशी पारितोषिके देता येतील.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरणः  शाळा सुरु करण्यापूर्वी त्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.

शाळा सुरू झाल्यानंतर उपाययोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना

शाळेचा परिसरः शाळेचा परीसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या व वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठभाग जसे स्वच्छतागृहे, हॅण्डल, अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टॅबलेट्स, खुर्च्या, वाहने इत्यादी वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शाळेतील व शाळेच्या परीसरातील सर्व कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्यात यावी.

साबण, हॅण्डवॉश, स्वच्छ पाणीः हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅण्डवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात यावे. सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात यावी. विद्यार्थ्यांनी सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळा व वर्ग खोल्यांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये.

शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे: जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात.  सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी शाळेत येताना व शाळेत असेपर्यंत तसेच, शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर करावा. तसेच, विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाची दररोज Thermal Screening चाचणी घेण्यात यावी. विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला शाळेच्या परिसरात व शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश देऊ नये.

 बायोमेट्रिक उपस्थितीवर बंदीः काही विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास ते त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणावे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पध्दत टाळण्यात यावी. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांची संख्या लक्षात घेऊन मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. शाळेत जलतरण तलावाचा वापर करण्यात येऊ नये.

प्रत्येक शाळेमध्ये वैद्यकीय मदत कक्षः सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. हेल्थ क्लिनीकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व परिचारीकांची मदत घ्यावी. शक्य असल्यास वैद्यकीय मदत कक्ष (Health Clinic) सुरु करावे. शक्य असल्यास यासाठी इच्छूक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. विद्यार्थ्यांचे दररोज तापमान तपासणी करावी.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोयः कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे. वाहन चालक व वाहक यांनी स्वतः तसेच विद्यार्थी शारीरिक अंतराचे पालन करतील याची दक्षता घ्यावी. १००% लसीकरण झालेल्या वाहनचालक व मदतनीस यांचीच सेवा घ्यावी. दोन लस घेतले नसलेल्या वाहनचालक व मदतनीसांना सेवेमध्ये घेऊ नये. बस / कार यांच्या खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात. वातानुकुलित बसेसमध्ये २४ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान राखावे. शक्य असल्यास वाहनात हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावे.

कर्मचारी व विद्यार्थी यांचा सुरक्षित प्रवेश व गमन (Entry and Exit) :.  दर दिवशीच्या दोन सत्रांच्या मध्ये योग्य तो कालावधी देण्यात यावा ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य ते शारिरिक अंतर राखणे शक्य होईल. शाळेस एकापेक्षा अधिक प्रवेशद्वार असल्यास शाळेत येताना व जातांना सर्व प्रवेशद्वारांचा वापर करावा. कुटुंबातील एखादा सदस्य ताप/खोकला यांनी आजारी असल्यास आपल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये.

वर्गखोल्या व इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करावी: पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा शक्यतो घेऊ नये. आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करुन घेण्यात यावेत.म्हणजे शारीरिक अंतराचे (Physical Distancing) पालन करणे सुलभ होईल. विद्यार्थ्यांनी कोणतेही साहित्य जसे पुस्तके, वही, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल, शाळेत येतानासोबत आणावे व त्यांची अदलाबदल करू नये. वर्गखोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. लिफ्ट व व्हरांड्यांतील उपस्थित व्यक्तीच्या संख्येवर निर्बध आणावेत. स्वच्छतागृहामध्ये अधिक गर्दी होऊ नये, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी प्रत्येक कृती केल्यानंतर हात स्वच्छ धुण्यासाठी त्यांना वारंवार सूचनादेण्यात याव्यात. वातानुकुलित वर्ग खोल्यां असल्यास तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस ठेवावे.

अभ्यासवर्गांची व्यवस्थाः  जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात  प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये. प्रत्यक्ष वर्गांकरिता जेवणाची सुटी नसेल.

कोरोना संशयित आढळल्यास करावयाची कार्यवाहीः  शिक्षक, कर्मचारी वर्ग किंवा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळेठेवावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करुन त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळतील याचीदक्षता घ्यावी. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यास तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे. शाळेजवळील कोविड सेंटर/आरोग्य केंद्राबद्दलची माहिती मुख्याध्यापक व प्रत्येक शिक्षकांच्या मोबाईलमध्ये संबंधित वैद्यकीय अधिकारी, संपर्क अधिकारी, रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक व कृती आरखडा असावेत.

खेळाच्या मैदानाबाबत: सद्य:स्थितीत १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येवू नयेत.

आजारी विद्यार्थी शोधणे: ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छवास करणारे, शारिरावर ओरखाडे, डोळे लाल झालेले, ओठफुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे सुजलेले, उलटया-जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्थाकरावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा.

विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामः विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणेखालील लक्षणे दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी. जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोटयाश्या गोष्टीत निराश होणारे वर्गात नेहमी शांत बसणारे व कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे,  वयाशी विसंगत वर्तणूक दर्शविणारे उदा. अंगठा चोखणे इत्यादी  खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शविणारे शालेय शिक्षणात असामान्य घट दर्शविणारे, असहाय्य झालेले व सतत रडणारे विद्यार्थी. अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी व त्याच्याशी संवाद साधावा. अशा विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करावे.

कोरोनासदृश्य लक्षणे निर्माण झाल्यासः शाळेतील कोणाला कोरोनासदृश्य लक्षणे दिसू लागल्यास घाबरुन जाण्याचे किंवा अशा व्यक्तीला भेदभावाने वागवण्यात येऊ नये. पालक आणि वैद्यकीय सुविधा केंद्रास कल्पना द्यावी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होई पर्यंत किंवा पालक येई पर्यंत अशा विद्यार्थ्याला मास्कसह शाळेतील वेगळया खोलीत ठेवावे. कोरोनाबाधित विद्यार्थी वर्गामध्ये आढळल्यास पुढील प्रमाणे कृती योजना करण्यात यावी. तो विद्यार्थी वर्गामध्ये ज्या रांगेत बसतो त्यांच्या मागील, पुढील आणि दोन्ही बाजच्या ३ रांगेतील विद्यार्थ्यांना निकट सहवासित मानावे.

याशिवाय इतर कारणामुळे बाधित विद्यार्थ्यांच्या निकट संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची/ शिक्षकांची यादी करावी. अशा निकट सहवासित विद्यार्थ्यांना २ आठवडयांकरिता होम क्वारंटाईन करावे. या काळात ज्यांना कोविड सारखी लक्षणे आढळतील त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. ज्यांच्या मध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाही अशा विद्यार्थ्यांनी ५-१० दिवसांनंतर कोरोना चाचणी करुन घ्यावी.

ज्या वर्गात विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले त्या वर्गातील बाके १% सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच स्वच्छतागृहे, सामायिक जागा यांचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. शाळेत काही विद्यार्थी/ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोनासारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोणी कोविड बाधित आढळल्यास शाळेत आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी शाळा मुख्याध्यापक व प्रशासनाने घ्यावी.

विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यबाबत शिक्षकांना मार्गदर्शनः  पहिल्या १ ते २ आठवडयामध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांस शाळेची सवय होवू द्यावी. त्यासाठी आंनददायी शिक्षणांवर भर द्यावा. ज्यामुळे मुलांना शाळेची गोडी निर्माण होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी अवगत करुन त्यानुसार विद्यार्थ्याशी परस्परसंवाद साधावा. कोरोना होवून गेलेल्या विद्यार्थ्यांशी सहानुभूतीने वागणे. विद्यार्थी व पालकांशी ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने संपर्कात राहणे.

शिक्षक पालक बैठकीत चर्चा: कोविड आजाराबाबत माहिती व सदर आजार टाळण्याबाबत पालकांना माहिती द्यावी. पालकांच्या प्रश्नांना परस्पर संवादाने उत्तरे द्यावीत. मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पध्दतीने पालकांनी लक्ष ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करणे. लवकर उठून शाळेच्या वेळेत मुलांना तयार करणे. मुलांना कमीत कमी पुस्तके / वह्या न्याव्या लागतील अशी व्यवस्था करावी.

घरात प्रवेश करताना घ्यावयाची काळजी:  घरात आल्यानंतर थेट वॉशरुमकडे जाणे, स्नान करुन युनिफॉर्म बदलणे, आंघोळीनंतर युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावा किंवा संबंधित शाळेने विद्यार्थ्यांना युनिफॉर्म ऐच्छिक करावा. मास्कसुध्दा साबणाच्या पाण्याने धुवून बाहेर वाळत ठेवावा. पालकांनी मुलांना शाळेचे उपक्रमबाबत अवगत करुन मुलांना पुढील दिवसासाठी तयार करावे.

मानसिक व सामाजिक कल्याणः  चिंता आणि निराशा यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या नोंदविणाऱ्या किंवा सांगणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नियमित समुपदेशन केले जाईल, याचे नियोजन करावे. उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा