गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा, ‘आप’च्या धसक्याने भाजपने केला नेतृत्व बदल?

0
904
संग्रहित छायाचित्र.

अहमदाबादः गुजरात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या एक वर्षावर आलेल्या असतानाच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर विजय रूपाणी यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. गुजरातमध्ये गेल्या दिवसांपासून आम आदमी पार्टीचा (आप) होत असलेला फैलाव पाहता हे आव्हान पेलण्यासाठी भाजपने हा नेतृत्व बदल केल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते.

 मला पाच वर्षांसाठी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली, माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे, असे रुपाणी  यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. पक्षात वेळोवेळी नेतृत्व बदल होत असतात, पक्षात ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, असा दावा रूपाणी यांनी केला आहे.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरूवारी रात्री ८ वाजता अचानक अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या कार्यक्रमाच्या आखणीत गुजरात दौऱ्याचा उल्लेखही नव्हता. गुरूवारी रात्री अमित शहा अहमदाबादमध्ये आपल्या बहिणीच्या घरी थांबले होते. त्यामुळे ते कौटुंबिक कामासाठी अहमदाबादेत आले असावेत, असा अंदाज बांधला जात असतानाच आज मुख्यमंत्री रुपाणी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.

अँटीइनकम्बेसीची टाळण्याचा प्रयत्नः वर्षभरानंतर गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्वाचा मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत अँटीइनकम्बेसी म्हणजेच सरकारविरोधी जनभावनेला सामोरे जाऊ लागू नये म्हणून भाजपने वर्षभर आधीच रुपाणींकडून राजीनामा घेतल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने उत्तराखंडचाही मुख्यमंत्री बदलला होता. त्यामागेही हेच कारण सांगितले जात होते.

आपचे आव्हानः गेल्या काही दिवसांत गुजरातमध्ये आम आदमी पार्टी झपाट्याने विस्तारत चालली आहे. आम आदमी पार्टीचा विस्तार आणि या पक्षाला मिळत असलेला लोकांचा पाठिंबा हे भाजपसाठी एक मोठे आव्हान ठरू लागले आहे. त्यामुळेच भाजप गुजरात विधानसभेची निवडणूक नव्या नेतृत्वात लढू पहात आहे. नव्या नेतृत्वाला काम करण्यासाठी वेळ मिळावा म्हणूनच हा बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बदलामुळे गुजरात भाजपमध्ये गटबाजी फोफावण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. रुपाणींचे समर्थक भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

नवीन मुख्यमंत्री कोण?: भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला हे कडवा पटेल समुदायाचे आहेत. गुजरातमध्ये या समुदायाचा मोठा प्रभाव आहे. ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीयही मानले जातात. दुसरे एक नेते नितीन पटेल ज्येष्ठ आमदार आहेत आणि उपमुख्यमंत्रीही आहेत. पक्षावर त्यांची चांगली पकड आहे. पुढील मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेत त्यांचेही नाव घेतले जात आहे. गुजरातचे माजी गृहमंत्री आणि पाटीदार समाजाचे नेते गोवर्धन झपडियाही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा