मृत्यू शय्येवरील कोरोनाग्रस्त पतीपासून महिलेला हवी गर्भधारणा, वाचा कशी पूर्ण होणार इच्छा!

0
725
प्रातिनिधिक छायाचित्र.

अहमदाबादः कोरोना संक्रमणामुळे मृत्यूशी झुंज देत शेवटच्या घटका मोजत असलेल्या पतीपासून एका पत्नीला गर्भधारणा आणि मुल हवे आहे. आपली गर्भधारणेची इच्छा पूर्ण करण्यासाठी या महिलेने थेट उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयानेही या महिलेची मागणी पूर्ण करत तिची पतीपासून गर्भधारणेची इच्छा पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ही घटना आहे गुजरातची. या महिलेचा ऑक्टोबर २०२० मध्ये विवाह झाला. कॅनडामध्ये चार वर्षांपूर्वी एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर या दाम्पत्याने विवाहाचा निर्णय घेतला होता. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र सासऱ्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी हे दाम्पत्य मार्च २०२१ मध्ये भारतात परतले. कोरोना महामारीत या वर्षीच्या मे महिन्यात महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली. १० मेपासून पतीला वडोदरा येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती दिवसेंदिवस नाजूक बनत गेली. त्याला बरे करण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. मात्र अवयव निकामी झाल्यामुळे अखेर डॉक्टरांनीही माघार घेतली.

 कोरोनाचा संसर्ग महिलेच्या पतीच्या फुफ्फुसात पोहोचल्यामुळे ते हालचालही करू शकत नव्हते. त्याची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या महिलेच्या पतीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी महिला आणि तिच्या सासऱ्याशी बोलताना डॉक्टरांनी तिच्या पतीची प्रकृती आता सुधारणार नाही, ते अखरेच्या घटका मोजत आहेत, असे सांगितले. त्यांच्याकडे जास्तीत जास्त तीन दिवस असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.

पती काहीच दिवसांचा सोबती असल्याचे कळताच त्याची शेवटची निशाणी म्हणून या महिलेने आयव्हीएफ ट्रिटमेंटच्या आधारे पतीपासून गर्भधारणा आणि मुल हवे असल्याची इच्छा त्या महिलेने डॉक्टरांकडे व्यक्त केली. मात्र, डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला. डॉक्टरांनी महिलेच्या निर्णयाबद्दल सन्मान व्यक्त करतानाच मेडिको लीगल ऍक्टचे बंधन असल्याचे सांगितले. आयव्हीएफसाठी स्पर्मचे नमुने घेण्यासाठी पतीची मंजुरी आवश्यक आहे, असे डॉक्टर म्हणाले. परंतु पती बेशुद्ध असल्याने त्याची मंजुरी घेणे शक्य नव्हते.

डॉक्टरांच्या सांगण्यानंतरही महिलेने हार मानली नाही. दोघांच्या प्रेमाची निशाणी हवी म्हणून महिलेने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. महिलेच्या या निर्णयाला तिच्या सासू-सासऱ्यांनीही पाठिंबा दिला. सोमवारी सायंकाळी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयानेही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेतली.

मंगळवारी या याचिकेवर सुनावणी करताना काही क्षणांसाठी गुजरात उच्च न्यायालयाचे दोन सदस्यीय खंडपीठही स्तब्ध झाले होते. काही वेळातच उच्च न्यायालयाने त्या महिलेला व्हेन्टिलेटरवर असलेल्या पतीच्या स्पर्मपासून गर्भधारणा करण्याची परवानगी दिली आणि पतीचे स्पर्म काऊंट देण्याचे निर्देश रूग्णालयाला दिले. यामुळे मृत्यू शय्येवर असलेल्या पतीपासून आयव्हीएफ म्हणजेच स्टेट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा आणि मुल प्राप्तीची त्या महिलेची इच्छा पूर्ण होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा