हसन मुश्रीफ सोडणार अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, जाणून घ्या काय आहे कारण…

0
763
संग्रहित छायाचित्र.

अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडणार आहेत. कोल्हापूर हा त्यांचा स्वजिल्हा आहे. त्यामुळे कोल्हापूरकडे जास्त लक्ष देता यावे, यासाठी आपल्याला अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे. आपल्याला अहमदनगरपेक्षा कोल्हापूर जास्त महत्वाचे आहे, असे सांगत त्यांनी अकोले येथे बोलताना स्वतःच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या पालकमंत्रिपदाच्या वाटणीत अहमदनगरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर कोल्हापूरचे पालकमंत्रिपद काँग्रेसच्या वाट्याला गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरच्या पालकमंत्रिपदी हसन मुश्रीफ यांची नियुक्ती केली. काँग्रेसने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली होती खरी, परंतु थोरात तेथे जाण्यास इच्छूक नव्हते. आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असल्याने आपल्याला कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, अशी भूमिका त्यांनी घेतली.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

 दुसरीकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असलेले हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने अनिच्छेनेच अहमदनगरचे पालकमंत्रिपद स्वीकारावे लागले. पालकमंत्री म्हणून ते अधूनमधून अहमदनगर येतात. परंतु त्यांचा कायम ओढा कोल्हापूरकडेच राहिला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे मुश्रीफ कोल्हापूरमध्येच जास्त अडकून पडले. अहमदनगर जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौराही त्यांनी रद्द केला होता. त्यावरून त्यांच्यावर टिकाही झाली होती.

आज अहमदनग जिल्ह्याच्या दोन दिवशीय दौऱ्यावर आलेल्या हसन मुश्रीफ यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता अहमदनगरचे पालकमंत्रिपद आपल्याला नको, अशी भूमिका आपण पक्षाच्या बैठकीत मांडल्याचे सांगत त्यांनी हे पद सोडण्याचा विचार असल्याचे मान्य केले.

नजीकच्या काळात कोल्हापूर आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यात एकाच वेळी विविध निवडणुका होणार आहेत. कोल्हापूर आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांत खूप अंतर असल्यामुळे मला दोन्ही जिल्ह्यांना न्याय देता येणार नाही. स्वजिल्हा म्हणून मला कोल्हापूरमध्ये जास्त लक्ष घालणे आवश्यक आहे. त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, अशी मागणी आपण पक्षाकडे केली आहे, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा