हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांची रझाकारीः बलात्कार पीडितेच्या कुटुंबालाच बेदम मारझोड

0
156
संग्रहित छायाचित्र.

हाथरसः उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचे पोलिस हाथरसमध्ये रझाकाराप्रमाणे वागत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना आज अखेर हाथरसमध्ये प्रवेश दिल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस आणि प्रशासन सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला धीर देण्याऐवजी त्यांच्याशीच कसे क्रौर्याने वागले, याचा पर्दाफाश झाला आहे. नराधमाच्या पाशवी कृत्याला बळी पडून ज्या कुटुंबाने आपली मुलगी गमावली त्याच कुटुंबाला उत्तर प्रदेश पोलिसांनी अमानुष मारहाण केली आणि धमक्या दिल्याचे या कुटुंबाने माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. आमचा कोणावरही विश्वास नसून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या एकूणच प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली आहे.

 हाथरसमधील सामूहिक बलात्कार पीडितेचा मृतदेह घाई गडबडीत परस्पर जाळून टाकल्याच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी आज माध्यमांना हाथरसमध्ये प्रवेश दिला. विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी पीडित कुटुंबाच्या मुलाखती घेऊन त्यांची आपबिती जगासमोर मांडली आहे. त्यात पीडितेच्या कुटुंबाने उत्तर प्रदेश प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

 पोलिसांनी मुलीचे शेवटचे तोंडही पाहू दिले नाही. पोलिसांची कुणाचा मृतदेह जाळला आणि आम्ही कोणाच्या अस्थी आणल्या आहेत, हेही आम्हाला माहीत नाही. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आम्हाला प्रचंड धमकावले. तुमची मुलगी जर कोरोनाच्या संसर्गाने मेली असती तर काय केले असते?, असे सांगत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जबाब बदलण्यासाठी धमकावले, असे पीडितेच्या आईने माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. एसआयटीचे पथक आणि अन्य अधिकारी आमच्या घरी आले. तेव्हा ते एकच गोष्ट सांगू लागले होते. तुम्हाला पैसे मिळत आहेत…. अरे तुम्हाला पैसे मिळत आहेत…. तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले तुम्हाला माहीत आहे का?, असे सांगत होते, असे पीडितेची आई म्हणाली. आमच्या खात्यात किती पैसे आले हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला न्याय हवा आहे, असेही ही आई म्हणाली.

हेही वाचाः राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार, म्हणालेः जगातील कोणतीही ताकद मला रोखू शकत नाही!

 पोलिसांनी आम्हालाच मारझोड केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाला पाहिजे. आम्हाला सीबीआय चौकशी नको आहे. आमचा कोणावरच विश्वास नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली हा तपास झाला पाहिजे. आमची नार्को टेस्ट केली पाहिजे असे सांगितले जात आहे. परंतु नार्को टेस्ट तर जिल्हा दंडाधिकाऱ्याचीच झाली पाहिजे. आम्ही तर जे घडले ते खरे सांगत आहोत, असे पीडितेच्या वहिणीने सांगितले.

 बुधवारी रात्री १० वाजता पोलिस आमच्या घरी आले. त्यांनी आम्हाला कुठेही जाऊ दिले नाही. आम्हाला कुणाशीच संपर्कही साधू दिला नाही. या प्रकरणाचा तपास नीट झाला पाहिजे अशी आमची इच्छा असल्याचे पीडितेचा भाऊ म्हणाला.

हेही वाचाः योगींविरूद्ध उमा भारतींचेच बंडः एसआयटी चौकशीत कुणीही भेटू नये असा नियम कुठे आहे?

विशेष म्हणजे हाथरसमध्ये ३०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पीडित कुटुंबाच्या घराबाहेर आणि गावातील प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. पीडितेच्या गावावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जात आहे.

 जिल्हा दंडाधिकाऱ्यांना योगी सरकारचे अभयः हाथरसमध्ये सुरू असलेल्या पोलिसांच्या दडपशाहीविरोधात देशभरात आंदोलने होऊन निषेधाचे आवाज उठू लागल्यानंतर योगी सरकारने शुक्रवारी हाथरसचे पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांच्यासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र या एकूणच प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाशी अमानुषतेने वागून जबाब बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत, धमक्या देणारे जिल्हा दंडाधिकारी प्रवीणकुमार लक्षकार यांना मात्र योगी आदित्यनाथ सरकारने अभय दिले आहे. त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे योगी सरकारच्या एकूणच भूमिकेवर शंका घेण्यात येऊ लागल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा