योगींविरूद्ध उमा भारतींचेच बंडः एसआयटी चौकशीत कुणीही भेटू नये असा नियम कुठे आहे?

0
121
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून देशभर टिकेचा विषय ठरलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनीच बंड केले आहे. एसआयटी चौकशी सुरू असताना पीडितेच्या कुटुंबाला कोणीच भेटू नये, असा नियम असल्याचे माझ्या ऐकिवात नाही, त्यामुळे एसआयटी चौकशीच संशयाच्या भोवऱ्यात आली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

मी हाथरसच्या घटनेच्या बाबतीत पाहिले आहे. आधी तुम्ही या प्रकरणात योग्य कारवाई करत असाल असे मला वाटले होते, म्हणून मी बोलू नये असे मला वाटले होते. परंतु ज्या प्रकारे पोलिसांनी गाव आणि पीडित कुटुंबाची घेराबंदी केली आहे, त्याचे काहीही तर्क असू दे पण त्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

 ती एक दलिताची मुलगी होती. पोलिसांनी घाईगडबडीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत आणि आता पोलिसांनी गाव आणि त्या कुटुंबाची घेराबंदी केली आहे. तुम्ही एक स्वच्छ प्रतिमा असलेले शासक आहात. मीडियाचे लोक आणि राजकीय पक्षांच्या लोकांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू द्या, अशी विनंतीही उमा भारती यांनी योगी आदित्यनाथ यांना केली आहे. भाजपमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ आहे, अशी आठवणही त्यांनी योगी आदित्यनाथ यांना करून दिली आहे.

मी कोरोना वॉर्डात खूपच बैचेन आहे. जर मी कोरोना पॉझिटिव्ह नसते तर मीही त्या गावात जाऊन पीडितेच्या कुटुंबाला भेटले असते आणि त्यांच्यासोबत बसले असते. मला आयआयएमएस ऋषिकेशमधून सुटी मिळाल्यानंतर मी पीडितेच्या कुटुंबाची जरूर भेट घेईन, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

योगींची कारवाईः आपल्याच पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने कान उपटल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेवटी कारवाई केली. पीडितेच्या कुटुंबाला धमकावणारे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना अडवणारे जिल्हा पोलिस अधीक्षक, उप अधीक्षक आणि पोलिस निरीक्षकांना निलंबित केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा