‘संस्कृती रक्षक’ योगींच्या पोलिसांनी घातला प्रियंका गांधींच्या कुर्त्याला हात, देशभरातून संताप

0
297
छायाचित्रः twitter/@rautsanjay61

नवी दिल्ली/मुंबईः हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या कुर्त्याला हात घालून उत्तर प्रदेश पोलिसांनी झटापट केल्याच्या घटनेमुळे देशभरातून उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संस्कृती रक्षक असल्याचा दावा करणाऱ्या भाजपची हीच का खरी संस्कृती असा सवालही या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला जाऊ लागला आहे.

 या पेक्षा लज्जास्पद आणि घातक दुसरे काय असू शकते? अशा गुंडगिरीवर उतरलेले भाजप सरकार आणि आदित्यनाथ यांनी बुडून मरायला हवे. प्रियंका गांधींवर पुरूष पोलिसांकडून हात उचलून आदित्यनाथ आपले कोणते संस्कार दाखवून देत आहेत? भेकाडांप्रमाणे पोलिसांच्या मागे लपू नका, समोर येऊन आपल्या कुकर्मावर राजीनामा द्या, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

 शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांचा कुर्ता पकडल्याचे छायाचित्र शेअर करत योगी राजमध्ये महिला पोलिस नाहीत का?, असा सवाल केला आहे. तर इतिहास याची नोंद घेईल आणि भविष्यकाळ कधीच माफ करणार नाही, असे गृहनिर्माण मंत्रि जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः हाथरसच्या पीडित कुटुंबाच्या वतीने प्रियंका गांधींनी विचारले पाच प्रश्न, सीबीआय चौकशीवरही सवाल

एखाद्या महिलेच्या कपड्यांना हात घालण्याची पुरूष पोलिसाची हिम्मत कशी झाली? पोलिसांनी आपल्या मर्यादांचे भान ठेवायलाच हवे. भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा पोलिसांवर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशचे पोलिस आणि प्रशासन प्रियंका गांधींसोबतच असे गैरवर्तन आणि गंडगिरी करत असेल तर सर्वसामान्य महिलांचे या प्रशासनाच्या हाती काय हाल होत असतील? ते आम्हालाही माहीत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचा धिक्कार असो, असे अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी म्हटले आहे. हाथरसच्या पीडित कुटुंबापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांनी प्रियंका गांधींचे अभिनंदनही केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा