हाथरस बलात्कारः उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्ली महिला काँग्रेस अध्यक्षाचे कपडे फाडले!

0
703
छायाचित्रःtwitter/@amritadhawan1

नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेश पोलिसांच्या क्रौर्याचा भेसूर चेहरा समोर येऊ लागला आहे. हाथरसच्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अमृता धवन यांना अडवून पोलिसांनी त्यांचे कपडे फाडले. अमृता धवन यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

 योगी-मोदी सरकारच्या संस्कारांचा हा पुरावा आहे. ताकतच दाखवायची असेल तर गुन्हेगारांना दाखवा. आमचे वस्त्रहरण करून तुम्हाला काय मिळणार आहे? द्रौपदीचे वस्त्रहरण आणि सीतेच्या हरणाचा अंत कुठे जाऊन थांबला, हे लक्षात ठेवा, असे अमृता धवन यांनी म्हटले आहे.

 योगींनी राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळेः देशात अराजक माजले असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबाबत जे घडले त्याबद्दल योगी सरकारने स्वतःची चूक कबूल करावी. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य राहिले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात दोन दिवसांत बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ असाल तर योगी सरकारने राजीनामा दिला पाहिजे, असेही सुळे म्हणाल्या.

हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार- राऊतः उत्तर प्रदेश पोलिस ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले हे चित्र कोणत्याही सुसंकृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देत नाही. राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल विरोधी पक्षाने आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही? आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्याला खाली पाडत असाल तर मी म्हणेन या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा