औरंगाबादः आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी आज राज्यभर परीक्षा होत असून परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरे सोडवून देण्यास मदत करणाऱ्या रॅकेटचा औरंगाबादेत पोलिसांनी भंडाफोड केला आहे. विशेष डिव्हाइस वापरून हे रॅकेट परीक्षार्थींना उत्तरे सोडवून देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
औरंगाबादेत ही परीक्षा सुरू असतानाच गेवराई येथील परीक्षा केंद्रावर डमी उमेदवार परीक्षा देत असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गेवराईच्या परीक्षा केंद्रावर डमी उमेदवाराला पकडल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खोकडपुऱ्यातील एका अभ्यासिकेवर धाड टाकली असता ऑनलाइन पद्धतीने परीक्षार्थ्यांना उत्तरे सांगणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली आहे.
गेवराईतील डमी उमेदवाराच्या माहितीनुसार पोलिसांनी खोकडपुऱ्यातील गजाजन अभ्यासिकेवर धाड टाकली. अभ्यासिकेला बाहेरून कुलूप लावलेले होते. मात्र आतमध्ये १० ते १५ जण परीक्षार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उत्तरे सांगत होते. पोलिस आल्याची माहिती मिळताच या तरूणांनी इमारतीवरून उड्या टाकून पोबारा केला. पोलिसांना या ठिकाणी प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती, पुस्तके सापडल्याची माहिती मिळते. पोलिसांकडून अद्याप कारवाई सुरू आहे.
या तरूणांकडे उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती कोठून आल्या? आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा या रॅकेटमध्ये हात आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून चिकलठाणा पोलिस या दिशेने तपास करत आहेत.