मुंबईत गणितशास्त्रीय अंदाजानुसार कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ नाहीः राजेश टोपेंचा खुलासा

0
504
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  मुंबईत कोरोनाच्या रूग्णवाढीचा गणितीशास्त्रानुसार जो अंदाज मांडला जात आहे, त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करणार नाही. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईत रूग्णसंख्या वाढत नाही, असा खुलासा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. आरोग्य विभागातील एकही जागा रिक्त राहणार नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे.लॉकडाऊनच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने पदभरतीचे काम केले जाईल, असे टोपे म्हणाले.

टोपे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हा खुलासा केला. केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत या पथकाची बैठक झाली. त्यांनी मुंबईमध्ये दाट लोकवस्तीतील पॉझिटिव्ह रुग्णांपासून निकट सहवासितांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन करणे आवश्यक असल्याच्या मुद्यावर भर दिला. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेला सूचना देण्यात आल्या असून आता अधिक आक्रमकपणे संस्थात्मक क्वारंटाईनसाठी कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी मैदाने, हॉल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे टोपे म्हणाले.

मुंबईत मैदाने, हॉलमध्ये क्वारंटाइनची सोयः मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी, गोरेगाव येथे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून त्याद्वारे सुमारे २००० नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत. कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांनी नियमांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या भागातील नगरिकांनी अधिक जागरूक राहून संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही टोपे यांनी सांगितले. लक्षणे असल्यास ती समाजाच्या भीतीने ती लपवू नका. संसर्ग टाळण्यासाठी पुढे येऊन लवकर निदान करून घ्या. समाजाचे नुकसान होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

पॉझिटिव्ह रूग्णांचा चाचणी कालवाधी कमी करणारः राज्यात सध्या ६४ प्रयोगशाळा असून त्या माध्यमातून दिवसाला सुमारे ९ ते १० हजार चाचण्या होत आहेत. प्रयोगशाळांवरील चाचण्यांचा भार कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या १४ दिवसानंतर करण्यात येणाऱ्या दोन चाचण्यांचा कालावधी कमी करून तो सात दिवसांवर किंवा १० दिवसांवर आणावा का? किंवा दोन ऐवजी एकच चाचणी करावी का याबाबत आयसीएमआर कडून लवकरच मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील, असे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा