दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार!

0
340
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः बंगालचा उपसागर आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ- मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबतच मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. परंतु आता बंगालचा उपसागर आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील वातावरण बदलले असून विश्रांती घेतलेला पाऊस पुढील पाच दिवस पुन्हा सक्रीय होणार आहे.

हवामान खात्याने २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधी दरम्यानचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यात राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंदाजानुसार बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांबरोबरच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या काळात झाडांच्या खाली उभे राहू नका, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २८ ऑगस्ट रोजी नागपूर, वर्धा, बंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दिवशी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२९ आणि ३० ऑगस्ट रोजी राज्यभर मुसळधारः हवामान खात्याने २९ आणि ३० ऑगस्ट असे दोन राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या दोन दिवसांत बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा