औरंगाबादेत अवघ्या २४ मिनिटांत ५० मि.मी. तुफान पाऊस, विजांच्या तांडवाने जिवाचा थरकाप!

0
105
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः बुधवारी औरंगाबादकरांनी वरूणराजाचे रौद्ररुप अनुभवले. २४ मिनिटे विजांचा कडकडाट आणि ढगफुटीच्या वेगाने पडणारा पाऊस पाहून औरंगाबादकरांच्या जिवाचा अक्षरशः थरकाप उडाला. अवघ्या २४ मिनिटांतच झालेल्या ५० मि.मी. तुफान पावसाने शहराची दाणादाण उडवली.

औरंगाबादेत बुधवारी सायंकाळी पाऊणेपाच वाजेच्या सुमारास तुफान पाऊस सुरू झाला. पाहता पाहता पावसाचा वेग इतका वाढला की ताशी १२९.२ मि.मी. वेगाने पाऊस होऊ लागला. औरंगाबादेत ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट असे रौद्ररुप औरंगाबादकरांनी यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते. त्यामुळे अगदी हातावरच्या अंतरावरचेही काही दिसणे मुश्कील होऊ बसले होते.

 सुमारे अर्धातास कानठळ्या बसवणारा विजांचा कडकडाट सुरू होता. या तांडवामुळे ज्येष्ठ नागरिक आणि कच्चाबच्च्यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली आणि काळजाचा ठोका चुकला. अनेक ठिकाणी विजा पडल्याचा अफवाही पसरल्या, मात्र महसूल विभागात तशी अधिकृत नोंद कुठेही करण्यात आली.

या तुफान पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. अनेक घरांत पाणी शिरले. विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रस्त्यावर तर अक्षरशः ओढे वाहू लागले होते. औरंगाबादेत १ ते २० ऑक्टोबरदरम्यान ६०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी मात्र अवघ्या २४ मिनिटांतच ५० मि.मी. पाऊस झाला.  असा पाऊस औरंगाबादकरांनी कधीच अनुभवला नव्हता, असे अनेकांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी अवघ्या २४ मिनिटांत झालेल्या ५० मि.मी. पावसामुळे औरंगाबादेतील रस्त्यांवर असे पाणीच पाणी साचले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा