हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

0
257
छायाचित्रः एनसीएस.

मुंबईः हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागाला आज रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या ईशान्य भागात सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी तर हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले.  रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 राष्ट्रीय भूंकपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हे भूकंपाचे धक्के १० किलोमीटर खोलवरून बसले. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हा भूकंप जवळ असल्यामुळे त्याची तीव्रता अधिक जाणवते. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. मात्र या भूकंपाचे धक्के यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागातील लोकांना अधिक तीव्रतेने जाणवले. या भूकंपाचा केंद्र बिंदू यवतमाळजवळ होता.

या भूकंपाचे धक्के उमरखेड, पुसद, दिग्रस, कळमनुरी तालुक्यातही जाणवले. अनसिंग, दारव्हा, हिंगोली या ठिकाणीही या भूकंपाचे धक्के जाणवले.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात अधून मधून भूकंपाचे धक्के जाणवतच असतात. परंतु आज सकाळी जाणवलेला भूकंपाचा धक्का आजपर्यंतचा भूकंपाच्या धक्क्यांपेक्षा तीव्र होता. वसमत तालुक्यातील  पिंपळदरी, कुरूंदा, आमदरी,पांगरा शिंदे परिसर, कोथळज, औंढा नागनाथ तालुका आणि हिंगोली तालुक्यातील काही गावांत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोली शहराच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा