महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या पांडेच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?: गृहमंत्री देशमुखांचा सवाल

0
196
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे राजकीय भांडवल करून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या भाजपची या प्रकरणी एम्सच्या अहवालानंतर चांगलीच गोची झाली आहे. त्यावरून आता महाविकास आघाडीने भाजपवर आक्रमकपणे हल्ले चढवण्यास सुरूवात केली असून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेच्या प्रचाराला भाजप नेते देवेंद्र फडणवीस जाणार का? असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना सुशांतसिंह प्रकरणी अमेरिकेतील विद्यापीठाने तयार केलेल्या अहवालाचा दाखल देत गृहमंत्री देशमुख म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरण एका राजकीय पक्षाने वेगळ्या दिशेला नेले. प्रसारमाध्यमांकडून हे प्रकरण मोठे करण्यात आले, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एका पक्षाने सुपारीच घेतली होती. महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजप नेत्यांची मजल गेली होती, असेही देशमुख म्हणाले.

 बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली. आता ते राजकारणात गेले आहेत. ते बिहारमधून निवडणूक लढवत आहेत आणि देवेंद्र फडणवीस भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी आहेत. ज्यांनी महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी केली त्यांच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का? असा त्यांना माझा सवाल आहे, असे देशमुख म्हणाले.

 सुशांतसिंह प्रकरणाचे निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. बाहेरच्या राज्यातील कठपुतलींनाही आपल्या तालावर नाचवण्याचे काम या पक्षाने केले.महाराष्ट्राचे पाच वर्षे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यानिमित्ताने बदनाम झाला. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, असेही देशमुख म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा