एल्गार परिषद, कोरेगाव भीमा प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा गृहमंत्र्यांचा सूचक इशारा

0
538
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियानानिमित्त आयोजित केलेल्या एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा सूचक इशारा दिला आहे.

एल्गार परिषदेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सर्व माहिती घेणार आहे. या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे, याबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा करून पुढील भूमिका ठरवण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराला एल्गार परिषदच जबाबदार असल्याची तक्रार तुषार दामगुडे यांनी केली होती. त्या तक्रारीवरून पुण्याच्या फरासखाना पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. या तक्रारीवरून देशभरातील सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, विचारवंत यांना अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेचा संबंध मोदींच्या हत्येचा कट, काश्मीर आणि जेएनयू प्रकरणाशी जोडण्यात आला होता.या परिषदेत सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्ते विचारवंतांना शहरी नक्षलवादी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी सुरेंद्र गडलिंग, सुधा भारद्वाज, शोमा सेन, वरवरा राव, अरुण परेरा, व्हर्नन गोन्साल्वीस, महेश राऊत हे सामाजिक कार्यकर्ते आजही गजाआड आहेत. त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आणि नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलिसांच्या या वादग्रस्त कारवाईवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असतानाच राज्यात सत्ता बदल होऊन नवे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. अशा पोलिसांचे निलंबन करून निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

हे पोलिस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यातः रश्मी शुल्का( पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त), रविंद्रा कदम( सहपोलिस आयुक्त), शिवाजी पवार ( पोलिस उपायुक्त, तपास अधिकारी), सुहास बावचे( परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त, यांच्याच नेतृत्वात देशभरातील सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्या घरांवर छापे टाकून रात्रीतून अटक करण्यात आली.), व्यंकटेशम( विद्यमान पोलिस आयुक्त, यांच्याच काळात एल्गार परिषदेचा संबंध मोदींच्या हत्येचा कट, काश्मीर आणि जेएनयूशी जोडणयात आला.)

संघाच्या थिंक टँकच्या इशाऱ्यावर कारवाई? : एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) थिंक टँक असलेल्या एका एनजीओच्या सांगण्यावरूनच या प्रकरणात देशभरातील नामवंत बुद्धीवाद्यांना गोवण्यात आल्याची माहिती शरद पवारांना गृह खात्यातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा