घोड्यावर बसून ऑफिसला येणं अन् ऑफिसात घोडा लावणं नाय जमायचं, कारण….

0
943
प्रातिनिधिक छायाचित्र.

नांदेडः घोड्यावर बसून ऑफिसला येण्याची परवानगी मागणारा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक लेखाधिकारी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला असला तरी घोड्यावर बसून ऑफिसला येण्याची त्यांची इच्छा काही पूर्ण होण्याची शक्यता नाही. कारण तसा अहवालच नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना विभागात सहायक लेखाधिकारी असलेले सतीश पंजाबराव देशमुख यांनी पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे दुचाकीवर कार्यालयात येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे घोडा खरेदी करून घोड्यावर बसून कार्यालयात येण्याची आणि कार्यालयाच्या परिसरात घोडा बांधू देण्याची परवानगी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती.

हेही वाचाः घोड्यावर बसून ऑफिसला येऊ का? कर्मचाऱ्याने मागितली जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी

देशमुख यांच्या पत्रानंतर नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांचा अभिप्राय मागवला. पाठीच्या कण्याचा त्रास असलेल्या रुग्णांनी घोड्यावर बसून प्रवास केल्यास आणखी आदळआपट होते. त्यामुळे मनका दबण्याची, मनक्यामधील गादी दबण्याची तसेच सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठीच्या कण्याच्या आजार कमी न होता वाढण्याचीच दाट शक्यता आहे, असा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिष्ठातांनी पाठवला आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत कोरोना सेंटरमध्येच महिला रुग्णावर डॉक्टरकडून बलात्काराचा प्रयत्न

पाठीच्या कण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून टु व्हीलर न वापरता घोड्यावर बसून कार्यालयात येण्याची सतीश देशमुख यांची इच्छा अधिष्ठातांच्या या अभिप्रायामुळे अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. कारण जो त्रास कमी व्हावा म्हणून देशमुख वापरू इच्छित होते, त्या घोड्यामुळे त्यांचा आजार कमी न होता वाढण्याचीच शक्यता असल्यामुळे त्यांची घोड्यावर बसून येण्याची इच्छा अपूर्णच राहणार हे मात्र नक्की! घोड्यावर बसून ऑफिसात येण्याची परवानगी मागणारे देशमुखांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले, तसेच अधिष्ठातांचा हा अभिप्रायही व्हायरल झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा