औरंगाबादेत हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्स रात्री ११.३० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी

0
233
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः  मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट रात्री ११.३० वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून त्यानुसार महापालिका क्षेत्रातील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट सकाळी सात ते रात्री साडेआकरा वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.

राज्य सरकारने जारी केलेल्या मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचनांतील तरतुदींनुसार आयुक्त पांडेय यांनी औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार ३१ ऑक्टोंबरपर्यंत महानगरपालिका हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट्स या आस्थापना सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यात मुभा देण्यात येत आहे. अन्य व्यापारी आस्थापने सकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व औद्योगिक व उत्पादक युनिटसमध्ये अत्यावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंचे उत्पादन सरु करण्यास परवानगी असेल.

महानगरपालिका क्षेत्रातील मैदानी खेळ जसे की क्रिकेट, खो – खो, इनडोअर गेम बॅडमिंटन, लॉन टेनिस या खेळांच्या फक्त सरावासाठी मुभा देण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धा घेणे, उपक्रम राबवणे, संमेलन घेण्यावरील बंदी मात्र कायम आहे. तथापि, खेळांचा सराव करण्याच्या जागी गर्दी टाळावी. सरावासाठी आवश्यक तेवढ्याच खेळाडूंना प्रवेश द्यावा. दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये. सरावास येणार्‍या प्रत्येक खेळाडूचे थर्मल स्क्रिनिंग करण्याच्या सूचना आयुक्तांनी आदेशात केल्या आहेत.

सिनेमागृहे, मनोरंजन ठिकाणे, उद्याने मात्र बंदचः शहरातील सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजनाची ठिकाणे, उद्याने, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल व त्यासारखी स्थळे बंदच राहणार आहेत. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी नसल्याचे आयुक्त पांडेय यांनी औरंगाबाद महापालिका क्षेत्रासाठी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा