राज्यातील बार, हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी

0
65
संग्रहित छायाचित्र.

मुंबई  राज्यातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स आणि फूडकोर्ट्स सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून याबाबतच परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे. मिशन बिगिन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टस्, हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, विविध जिल्ह्यांतील प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळेमुळे हॉटेल-बार मालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. पर्यटन विभागाने याप्रकरणी पुढाकार घेतला असून सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल, बार खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे वेळापत्रक जाहीर करणारे परिपत्रकच त्यांनी जारी केले आहे.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत ५ ऑक्टोबरपासून हॉटेल,रेस्टॉरंट,बार आणि फूडकोर्ट  ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयाने शनिवारी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली. मात्र, हॉटेल, फूडकोर्ट्स, बार उघडण्याची तसेच बंद करण्याच्या वेळा ठरवण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्यामुळे सर्व जिल्ह्यांत वेगवेगळ्या वेळा जाहीर करण्यात आल्याने बार-रेस्टॉरंट मालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

व्यावसायिकांची ही नाराजी लक्षात घेऊन पर्यटन विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार हॉटेल आणि बार सकाळी ८ वाजता उघडतील व रात्री १० वाजता बंद करण्यात येतील असे नमुद करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची  परिस्थिती पाहून यावेळेत बदल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा