चला उद्योजक बनाः एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

0
252

भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने राष्ट्रीय पशुधन मिशन (एमएलएम) ही योजना सुरू केली आहे. कुक्कुट पालन, शेळी, मेंढी, वराह पालन आणि चारा क्षेत्रातून उद्योजकता विकास, रोजगार निर्मिती, प्रतिपशु उत्पादकता वाढ करून मांस, बकरीचे दूध, अंडी आणि लोकरीचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. पशुधन उत्पादन प्रणालीमधे संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी आणि सर्व हितसंबंधी लोकांची क्षमता विकसित करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन मिशन (National Livestock Mission-NLM) सुरू करण्यात आले आहे.

जनावरांच्या चारा आणि खाद्य स्त्रोताच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, भारतात पशुधन क्षेत्र हा एक स्पर्धात्मक उद्योग बनवण्यास प्रोत्साहन देण्याकरिता, त्यातील निर्यात क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी या अभियानाचा आराखडा तयार केला गेला आहे. कृषी योग्य असलेल्या आणि नसलेल्या भागातील विशिष्ट कृषी-हवामानाच्या प्रदेशाला उपयुक्त अशा सुधारित आणि योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करून चाऱ्याचे उत्पादन आणि त्याची उत्पादकता वाढवण्यावर भर देणे हाही या मिशनचा हेतू आहे.

कोण करू शकतो या योजनेसाठी अर्ज?: कोणतीही व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट, कलम ८ नुसार नोंदणीकृत कंपन्या एनएलएम योजनेअंतर्गत अर्थ सहाय्यासाठी अर्ज करू शकतात.

सब्सिडी किती?: राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम) योजनेअंतर्गत ५० टक्के भांडवली अनुदानाची स्थापना केली जाते. ग्रामीण कुक्कुट पालन, ज्यात हॅचरी आणि ब्रूडर कम मदर युनिट, शेळी/ मेंढी यांचा समावेश आहे. प्रजनन फार्म, वराह प्रजनन फार्म, चारा मूल्यवर्धन (उदा. गवत/सिलेज/ एकूण मिश्र रेशन/चारा ब्लॉक) युनिट आणि स्टोरेज युनिट इत्यादींसाठी कमाल अनुदान मर्यादा वेगवेगळ्या घटकांनुसार बदलतात. ही अनुदान मर्यादा २५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत आहे.

विविध प्रकल्पांसाठी सब्सिडी मर्यादा खालील प्रमाणे आहेः

  • कुक्कुट पालन: २५ लाख रुपये.
  • शेळी आणि मेंढी पालन: ५० लाख रुपये.
  • वराह पालन: ५० लाख रुपये.
  • पशुखाद्य: ३० लाख रुपये.
  • अवधी: ३१ मार्च २०२२ पर्यंत.

कोणती कागदपत्रे हवीत?:  अर्जदाराचा प्रकल्पात वाटा असल्याचा पुरावा, प्रकल्पामध्ये सहभागी शेतकऱ्यांची यादी, अर्जदाराचा रहिवासाचा पुरावा, कंपनी असल्यास गेल्या तीन वर्षांचे लेखा परीक्षित आर्थिक विवरण, बँक स्टेटमेंट, मुख्य प्रवर्तकाचे पॅन व आधार कार्ड, आवश्यकता असल्यास जात प्रमाणपत्र, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र, स्कॅन केलेली छायाचित्रे, स्कॅन केलेली स्वाक्षरी इत्यादी कागदपत्रांची या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यकता भासते.

काय आहेत अटी?:  अर्जदाराकडे जिथे प्रकल्प असेल तिथे स्वतःची जमीन किंवा भाडेतत्वावरील जमीन असावी. जमीन भाडेपट्टा/ भाडे/ वैयक्तिक कार खरेदीसाठी कोणतेही अनुदान दिले जाणार नाही. या योजनेबाबत अधिक माहिती आणि तपशील देण्यासाठी चेतन भुतडा यांच्याशी +918855098984 या क्रमांकावर न्यूजटाऊनचा संदर्भ देऊन संपर्क साधू शकता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा