ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी?, वाचा संपूर्ण तपशील

0
251
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली असल्याची माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. या ई-पीक पाहणी मोबाईल ऍपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवायची, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशा शेतकऱ्यांसाठी ही माहिती….

  • गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.
  • पीक पेरणीची माहिती सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडावा.
  • जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दर्शविली जाईल.
  • हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या पैकी हंगाम निवडू शकता.

हेही वाचाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

  • पीक पेरणीसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र दर्शविले जाईल.
  • पिकांच्या वर्गामध्ये एक पीक पद्धती, मिश्र पीक, पॉलीहाउस पीक, शेडनेटहाउस पीक, पड क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा.
  • जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करावी.
  • पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्याय निवडावा.
  • पीक पर्याय निवडून शेतातील पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळ झाडांची संख्या व क्षेत्र नमूद करावे.
  • मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रापेक्षा जास्त होवू नये.
  • चालू हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे.
  • जलसिंचनाचे साधन पर्यायाखाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल.
  • त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.
  • शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.

ऊस नोंदणीसाठी  होणार १०० शंभर टक्के वापरः सर्व साखर कारखान्यातील ऊस नोंदणीसाठी सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी ई -पीक पाहणीचा १०० टक्के वापर करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच दिल्या आहेत, असेही जगताप यांनी सांगितले. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाबतच्या सर्व अडचणी दूर होतील. त्यासाठी सर्व शेतकरी खातेदार यांनी ॲप डाऊनलोड करून वापरावे. आपल्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो अपलोड करून पीक पेरा ऑनलाईन नोंदवावा, असे आवाहनही जगताप यांनी केले आहे.

सर्वाधिक प्रतिसाद नाशिक, अमरावती विभागातः राज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात (१.१९ लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे (९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती (८१ हजार) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोंकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा