शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

0
375
प्रातिनिधिक छायाचित्र.

शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी ही अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतकऱ्यांचे गट, समूह एकत्रित आणले जातात. परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात. या शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे, जसे की गुंतवणूक करणे, नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे, नवीन बाजारपेठ निर्माण करणे तसेच तयार असलेल्या बाजारपेठेत सुधारित प्रवेश करणे, विविध शेती पिकांचे उत्पादन घेणे तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे बाय-प्रॉडक्ट बनवणे, कंपनीमार्फत खरेदी-विक्री केंद्र उभारणे, मालाची प्रतवारी करून वर्गीकरण किंवा मालाची श्रेणी ठरवणे, बाजारपेठेमध्ये मालाची मार्केटिंग करणे, कंपनी सदस्यांनी उत्पादित केलेला माल कंपनीच्या नावाने ब्रँडिंग करणे, सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आयात करणे इत्यादी व्यवहार करता येतात.

कोण करू शकतो नोंदणी?:  कोणतीही व्यक्ती शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करू शकतो. शेतकऱ्यांचे समूह करून एकमेकांच्या फायदा करण्यासाठी या कंपनीची नोंदणी केली जाते.

शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी काय हवे?

 • किमान १० शेतकरी सभासद.
 • १० सदस्यांमधील किमान ५ संचालक असणे आवश्यक.
 • प्रत्येक सदस्याचा ७/१२ उतारा व शेतकरी असल्याच्या दाखला आवश्यक.
 • प्रत्येकाचे आधारकार्ड, मतदान कार्ड आणि प्रत्येकी दोन फोटो.
 • प्रत्येक सदस्याचे कायदेशीर दस्तऐवज आणि इतर कागदपत्रांची पूर्तता आवश्यक.
 • ज्या पत्त्यावर कंपनीची नोंदणी करावयाची आहे, तेथील लाइट बील.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे फायदे आणि विविध योजनाः केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध योजना आणि विविध फायदे उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी काही ठकळ योजना/ फायदे असेः

 • शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
 • सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ऑपरेशन ग्रीनला मंजुरी देण्यात आली आहे.
 • शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता आणण्यात आली आहे.
 • नाबार्डकडून सवलतीच्या दारात कर्जाची उपलब्धता करून देण्यात येते आणि विविध प्रकल्पांना अनुदानही मंजूर करण्यात येते.
 • समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान अगदी सुलभतेने उपलब्ध करून देण्यात येते.
 • राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अनेक प्रकल्प आणि योजना शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी सुरु करण्यात आल्या आहेत. भविष्यात त्यांची संख्या आणि व्याप्ती वाढणार आहे.
 • इक्विटी ग्रॅन्ट योजना:  दिल्लीच्या एसएफएसी या संस्थेकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना १५ लाख रुपयांपर्यंत इक्विटी ग्रॅन्ट दिली जाते.
 • क्रेडिट गॅरंटी फंड:  एसएफएसी या संस्थेकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांच्या प्रोजेक्टच्या ८५ टक्के किंवा जास्तीत जास्त १ कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण व कमी व्याज दाराने दिले जाते.
 • अवजारे बँका: महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बँका सुरु झालेल्या असून शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि यंत्रसामग्री भाडे तत्वावर आणि सुलभ हप्ताने दिली जातात.
 • स्मार्ट (SMART) प्रकल्प: जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्राज  ऍग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रकल्प दिले जाते. या योजनेअंतर्गत ५० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते.
 • स्फूर्ती योजनाः स्फूर्ती ही पारंपरिक उद्योगांच्या पुनर्निर्मितीसाठी निधीची योजना आहे. भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई), क्लस्टर डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी २००५ मध्ये ही योजना सुरू केली आहे. हा केंद्र सरकारच्या अनुदानाचा एक प्रकार आहे. या योजनेमध्ये ५ कोटींपर्यंत अनुदान मिळते.
 • पीएमएफएमई योजनाः केंद्र सरकार सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( पीएमएफएमई) ही योजना एक जिल्हा एक उत्पादन (ODOP-One District One Product) या आधारावर राबविली जाते. सदर योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येते.
 • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर केले जाते.

तुम्हालाही जर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून उद्योजक बनायचे असेल आणि त्यात काही अडचणी येत असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही चेतन भुतडा यांच्याशी +918855098984 या क्रमांकावर न्यूजटाऊनचा संदर्भ देऊन संपर्क साधू शकता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा