ब्रिटिशांची माफी मागणारे सावरकर ‘वीर’ कसे झाले?

0
332
छायाचित्रः विकीपीडिया

जर सरकार आपल्या असीम सद्भावना आणि दयाबुद्धीने माझी सुटका करत असेल तर मी संविधानवादी विकासाचा कट्टर समर्थक राहील आणि इंग्रजी सरकारला माझी निष्ठा अर्पण करून टाकीन, अशी मी हमी देतो, असे सावरकरांनी इंग्रजांना लिहून दिलेल्या माफीनाम्यात लिहिले होते.

  • कृष्णकांत

मूळ हिंदू धर्म आणि हिंदू श्रद्धेपेक्षा वेगळ्या राजकीय ‘हिंदुत्वा’ची स्थापना करणारे विनायक दामोदर सावरकर हे वीर सावरकर नावानेही ओळखले जातात. केंद्र आणि देशातील अनेक महत्वाच्या राज्यात सत्तारुढ असलेला भाजप हिंदुत्वाच्या याच विचारसरणीचे राजकारण करते. नुकत्याच झालेल्या आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने राष्ट्रीयत्व हा आपला सर्वात प्राधान्यक्रमाचा अजेंडा करण्याची घोषणा केली होती. भाजप ज्या हिंदुत्वाच्या विचाराच्या आधारावर भारत निर्माण करण्याचे स्वप्न पहाते, तो विचार सावरकरांनीच दिला होता. आज भाजप नेत्यांच्या भाषणांपासून पक्षाच्या पोस्टर्सपर्यंत सावरकरांना महत्वाचे स्थान मिळते. उग्र हिंदू राष्ट्रवादाच्या अजेंड्यावर चालणारा पक्ष सत्तेत असताना हिंदुत्व आणि त्याचे प्रणेते वि.दा. सावरकरांवर विचार करणे आवश्यक वाटते.

सावरकरांचे विचार काय होते? स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान काय होते? स्वातंत्र्य आंदोलनात सावरकरांची भूमिका काय होती? ज्यामुळे त्यांना वीर सावरकर या उपाधीने गौरवले गेले, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे.

पंतप्रधान होण्याआधी मुख्यमंत्री असतानाच्या काळात नरेंद्र मोदींनी जुलै 2013 मध्ये रॉयटर्स न्यूज एजंसीच्या दोन पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत स्वतः ‘हिंदू राष्ट्रवादी’  असल्याचे सांगितले होते.

भारतामध्ये राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याचा परस्पराशी अतूट संबंध आहे. राष्ट्रीयत्व स्वातंत्र्य लढ्याची ती भावना होती, जी या लढ्याचा आत्मा होता. याच दरम्यान हिंदू राष्ट्रीयत्व किंवा हिंदू राष्ट्रवादाचा विचार पेरण्यात आला. सावरकर त्या हिंदुत्वाचे जन्मदाते आहेत, जे हिंदू आणि मुसलमांनामध्ये फूट पाडणारे सिद्ध झाले. मुस्लिम लीगच्या द्विराष्ट्राच्या सिद्धांताप्रमाणे त्यांच्या हिंदुत्वानेही इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा नितीला मदतच केली.

राजकीय शास्त्रज्ञ आणि प्रोफेसर शम्सुल इस्लाम लिहितात, “हिंदू राष्ट्रवादी’ शब्दाची उत्पत्ती ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात एका ऐतिहासिक संदर्भात झाली. हा स्वातंत्र्य लढा मुख्यतः एका स्वतंत्र लोकशाही धर्मनिरपक्ष भारतासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात लढला गेला होता. ‘मुस्लिम राष्ट्रवाद्यां’नी मुस्लिम लीगच्या बॅनरखाली आणि ‘हिंदू राष्ट्रवाद्यां’नी हिंदू महासभा आणि आरएसएसच्या बॅनरखाली हिंदू आणि मुसलमान दोन भिन्न राष्ट्र आहेत, असे सांगत या स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला. आपल्या स्वप्नातील धार्मिक राष्ट्र ‘हिंदुस्तान’ किंवा ‘हिंदू राष्ट्र’ आणि पाकिस्तान किंवा इस्लामी राष्ट्र प्राप्त करता यावे म्हणून हा स्वातंत्र्य लढाच विफल करण्यासाठी या हिंदू आणि मुसलमान राष्ट्रवादयांनी आपल्या वसाहतवादी मार्गदर्शकांशी हातमिळवणी केली.’

नरेंद्र मोदी यांच्या या मुलाखतीनंतर प्रोफेसर शम्सुल इस्लाम यांनी नरेंद्र मोदींच्या नावे एक खुले पत्र लिहिले होते. त्यात ते लिहितात की, ‘भारताच्या विभाजनात मुस्लिम लीगची भूमिका आणि त्यांच्या राजकारणाबाबत लोकांना चांगलेच माहीत आहे. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ‘हिंदू राष्ट्रवाद्यां’नी किती गलिच्छ आणि कुटील भूमिका निभावली याबाबत तुमची स्मरणशक्ती ताजीतवानी करणे गरजेचे आहे.’ त्या पत्रानुसार, हिंदू राष्ट्रवादीमुस्लिम लीगप्रमाणेच द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवतात. हिंदुत्वाचे जन्मदाते वि. दा. सावरकर आणि आरएसएस या दोघांच्याही द्विष्ट्रवादाच्या सिद्धांतात हिंदू आणि मुसलमान दोन वेगवेगळी राष्ट्रे आहेत, हे स्पष्टपणे अधोरेखित करणारा विश्वास राहिलेला आहे. महम्मद अली जिनांच्या नेतृत्वात मुस्लिम लीगने 1940 मध्ये भारतातील मुसलमानांसाठी पाकिस्तानच्या रुपाने वेगळ्या मातृभूमीच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु सावरकरांनी तर त्याच्या खूप आगोदरच, 1937 मध्ये अहमदाबादेतील हिंदू महासभेच्या 19 व्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, अशी घोषणा केली होती.

शम्सुल इस्लाम या पत्रात सावरकरांच्या समग्र वाड्मयातून त्यांचे विचार उदधृत करतात. ‘सध्या भारतात दोन प्रतिस्पर्धी राष्ट्रे शेजारी-शेजारीच राहू लागली आहेत. हिंदुस्तान आधीपासूनच एक सदभावनापूर्ण राष्ट्राच्या रुपात निर्माण झाले आहे किंवा केवळ आमची इच्छा असल्यामुळे त्या रुपात ते निर्माण होईल, असे मानून काही अपरिपक्व राजकीयतज्ज्ञ गंभीर चूक करून बसतात. असे करून आमचे नेक नियत परंतु कच्चा विचार करणारे मित्र केवळ स्वप्नांना सत्यात बदलू इच्छितात. त्यामुळे ते जातीय तणावांमुळे अधीर होऊन जातात आणि त्यासाठी जातीय संघटनांना जबाबदार ठरवतात. परंतु वस्तुस्थिती हीच आहे की, तथाकथित जातीय प्रश्न दुसरे तिसरे काहीही नसून शेकडो वर्षांपासून हिंदू आणि मुसलमानांतील सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय प्रतिस्पर्धेचे परिणाम म्हणून आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. आम्हला अप्रिय वाटणाऱ्या या तथ्यांना हिमतीने सामोरे गेले पाहिजे. हिंदुस्तान हे एकतेत निर्माण झालेले राष्ट्र आहे, असे आज अजिबात मानले जाऊ शकत नाही. त्या उलट हिंदुस्तानमध्ये मुख्यतः दोन राष्ट्रे आहेत, हिंदू आणि मुसलमान.

सावरकर हे हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगवेगळी राष्ट्रे मानणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यविचारवंत आहेत. तेव्हापासून नंतर वर्षानुवर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली हिंदू राष्ट्राची कल्पना आणि हिंदू राष्ट्रवादाच्या विचारावर अढळ राहिला आहे. याच्या अगदी विपरित आरएसएस भारत- पाकिस्तानच्या फाळणीसाठी काँग्रेस, महात्मा गांधी आणि नेहरूंना दोषीही ठरवतो. विद्यमान काळात जे लोक जातीयवादाच्या विरोधात आहेत आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणी मानतात, हे हिंदू राष्ट्रवाद्यांसाठी सर्वात मोठे ‘गद्दार’ आहेत.

पंतप्रधानांनी ते स्वतः ‘हिंदू राष्ट्रवादी’ आहेत, हे सांगून टाकलेच आहे. जर हिंदू राष्ट्रवादी असणे गर्वाची बाब असेल तर हा गर्व एक समस्या निर्माण करतो. हिंदू राष्ट्रवाद्याप्रमाणेच मुस्लिम राष्ट्रवादी, शीख राष्ट्रवादी, ख्रिश्चन राष्ट्रवादीही असू शकतील. एवढे सगळे राष्ट्रवादी भारतीय राष्ट्रवादाच्या विरोधात अनेक फलटणींने एका गंभीर धोक्याच्या रुपाने उभे राहातील. भारतासारख्या विविधता असलेल्या राष्ट्राला एकाच धाटणीला घेऊन जाण्याची वकिली करणाऱ्या या हिंदूराष्ट्रवादात गर्व करावा असे काय आहे?

स्वातंत्र्य लढ्याच्या काळात हिंदू राष्ट्रवाद्यांनी भारतीय स्वातंत्र्य सेनानींना साथ देण्याऐवजी इंग्रजांना साथ दिली आणि इंग्रजांकडून त्यांच्यावर कारवाई न करण्याचे अभयदान मिळाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी आणि जपानच्या मदतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. या काळात ‘हिंदू राष्ट्रवाद्यां’ सुभाषचंद्र बोस यांना साथ देण्याऐवजी ब्रिटिश सरकारला साथ दिली. सावरकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्यासाठी सैन्य भरतीला मदत केली. पुढे चालून हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्यास सहाय्यभूत ठरलेला हिंदुत्वाचा अजेंडा सावरकरांनी पुढे रेटला.

वीर सावरकर समग्र वाड्मयाचा हवाला देऊन शम्सुल इस्लाम लिहितात की, ‘हिंदू राष्ट्रवाद्यांनी नेताजींना मदत करण्याऐवजी नेताजींच्या मुक्ती संघर्षाचा पराभव करण्यासाठी ब्रिटिश सरकारचे हात बळकट केले. हिंदू महासभेने ‘वीर’ सावरकरांच्या नेतृत्वात ब्रिटिश सैन्यात भरतीसाठी सैन्य भरती शिबिरे घेतली. हिंदुत्ववाद्यांनी इंग्रज शासकांपुढे सपशेल शरणागती पत्करली होती. ‘वीर’ सावरकरांच्या खालील वक्तव्यावरून ते अधिक स्पष्ट होते-

‘जोपर्यंत भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, हिंदू समाजाने भारत सरकारच्या युद्धासंबंधी प्रयत्नांमध्ये सहानुभूतीपूर्वक सहकार्याच्या भावनेतून कोणतीही भीडभाड न ठेवता सहभागी झाले पाहिजे, जोपर्यंत ते हिंदू हिताच्या फायद्याचे असेल. हिंदूंनी मोठ्या संख्येने सैन्य, हवाई दल आणि नौदलात सहभागी झाले पाहिजे आणि सर्व शस्त्रे, गोळाबारूद आणि युद्धाचे साहित्य तयार करणारे कारखाने वगैरेमध्येही भरती व्हायला हवे…

विशेष म्हणजे जपानने युद्धात उडी घेतल्यामुळे आपण ब्रिटनच्या शत्रूंच्या हल्ल्याच्या सरळ निशाण्यावर आलो आहोत. त्यामुळे आपली इच्छा असो वा नसो, आपणाला युद्धाच्या कहरापासून आपले कुटुंब आणि घर वाचवायचे आहे आणि ते भारतच्या सुरक्षेच्या सरकारी युद्ध प्रयत्नांना बळ देऊनच साध्य केले जाऊ शकते. इसिलिए हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः बंगाल आणि आसाम प्रांतात, जेवढ्या प्रभावी पद्धतीने शक्य असेल तेवढ्या प्रभावीपणे हिंदूंना विनाविलंब सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रेरित करायला हवे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू आपल्या एका लेखात लिहितात की, ‘सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, असे अनेक लोक मानतात. परंतु वस्तुस्थिती काय आहे?  वस्तुस्थिती ही आहे की, ब्रिटिश राजवटीच्या काळात अनेक राष्ट्रवाद्यांना अटक झाली. आमच्याशी हातमिळवणी करा, नाही तर आयुष्यभर तुरूंगामध्येच खितपत पडा, अशी प्रलोभने तुरूंगात ब्रिटिश अधिकारी देत असत. तेव्हा अनेक लोक ब्रिटिश सरकारचे हस्तक व्हायला तयार होत होते. त्यात सावरकरांचाही समावेश होता.’ न्या. काटजू लिहितात, खरे तर सावरकर 1910 पर्यंतच राष्ट्रवादी राहिले. तो हा काळ होता जेव्हा त्यांना अटक झाली होती आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरूंगात जवळपास दहा वर्षे घालवल्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर भागीदार होण्याचा प्रस्ताव ठेवला. तो सावरकरांनी स्वीकारला. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर सावरकर हिंदू जातीयवादाला बळकटी देण्याचे काम करू लागले. आणि एक ब्रिटिश एजंट बनले. ते फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला बळकटी देण्याचे काम करत होते.

 न्या. काटजू लिहितात, ‘दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी राजकारणाचे हिंदूकरण करा आणि हिंदूंचे सैनकीकरण करा’  हा नारा पुढे नेला. भारतात युद्धासाठी हिंदूंना ब्रिटिश सरकारकडून सैन्य प्रशिक्षण देण्याच्या मागणीचेही सावरकरांनी समर्थन केले. त्यानंतर जेव्हा काँग्रेसने 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरु केले, त्यावर सावरकरांनी टीका केली होती. त्यांनी हिंदूंना ब्रिटिश सरकारची अवज्ञा करू नका, असे सांगितले. सोबतच सैन्यात भरती व्हा आणि युद्ध कला शिका, असेही हिंदूंना सांगितले होते. असे सावरकर खरेच सन्मानाला पात्र आहेत काय आणि त्यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणायला हवे का? सावरकरांसाठी ‘वीर’ सारखे संबोधन कशासाठी? ते तर 1910 नंतर ब्रिटिशांचे एजंट बनले होते.’

‘वीर’ सावरकरांच्या हिंदुत्वाची चर्चा करताना शम्सुल इस्लाम लिहितात, ‘वस्तुतः आरएसएस ‘वीर’ सावरकरांनी निर्धारित केलेल्या विचारसरणीचे पालन करतो. आपल्या संपूर्ण जीवनात सावरकर जातीयवाद आणि मनुस्मृतीच्या पूजेचे एक मोठे प्रस्तावक राहिले आहेत, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. ‘हिंदू राष्ट्रवादा’च्या या प्रेरणेनुसार, ‘मनुस्मृती हा एक असा धर्मग्रंथ आहे, जो आमच्या हिंदूराष्ट्रासाठी वेदांनंतर सर्वाधिक पूज्यनीय आहे आणि तो प्राचीन काळापासूनच आमच्या सांस्कृतिक रुढी-परंपरा, विचार आणि आचरणाचा आधार बनलेला आहे. शतकानुशतके या ग्रंथाने आमच्या राष्ट्राच्या आध्यात्मिक आणि दैविक अभियानाला संहिताबद्ध केले आहे. आजही कोट्यवधी हिंदू आपले जीवन आणि आचरणात ज्या नियमांचे पालन करतात, ते मनुस्मृतीवरच आधारित आहेत. आज मनुस्मृती हिंदू विधी आहे.’

नथुराम गोडसेने 1948 मध्ये गांधीजींना गोळी मारून हत्या केली. संपूर्ण खंडालाच हादरवून टाकणाऱ्या या हत्येत आठ आरोपी होते. त्यात एक नाव वि. दा. सावरकरांचेही होते. मात्र त्यांच्या विरोधात हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही आणि त्यांची सुटका झाली. 1910-11 पर्यंत ते क्रांतिकारी कार्यामध्ये सहभागी होते. त्यांना अटक झाली आणि 1911 मध्ये त्यांना मंडालेच्या कुख्यात तुरूंगात टाकण्यात आले. त्यांना 50 वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु शिक्षा सुरु झाल्यानंतरच्या काही महिन्यांतच माझी सुटका करावी, अशी याचिका त्यांनी इंग्रज सरकारसमोर दाखल केली. त्यानंतर त्यांनी अनेक याचिका दाखल केल्या. आपल्या याचिकांत त्यांनी इंग्रजांना असे आश्वासन दिले की, जर माझी सुटका केली तर मी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून स्वतःला अलिप्त ठेवीन आणि ब्रिटिश सरकारला मी माझी निष्ठा अर्पण करून टाकीन. अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी हे आश्वासन पाळलेही आणि कुठल्याही क्रांतिकारी कार्यात ना सहभागी झाले, ना त्यांना अटक झाली!

वि. दा. सावरकरांनी 1913 मध्ये एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांच्याशी केलेल्या जाणाऱ्या व्यवहाराचा उल्लेख केला आणि म्हटले, ‘ हुजूर, मी आपणाला आठवण देऊ इच्छितो की, आपण दया दाखवून शिक्षा माफीसाठी 1911 मध्ये मी केलेल्या याचिकेवर पुनर्विचार करावा आणि ती भारत सरकारकडे फॉर्वर्ड करण्याची कृपा करावी. भारतीय राजकारणातील ताजा घटनाक्रम आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या सरकारच्या धोरणांनी संविधानवादी मार्ग पुन्हा एकदा खुला केला आहे. आता भारत आणि मानवतेचे कल्याण इच्छिणारा कोणताही व्यक्ती आंधळेपणाने त्या काटेरी मार्गावर चालणार नाही, जसे की, 1906-07 च्या निराशा आणि उत्तेजनेने भरलेल्या वातावरणाने आम्हाला शांतता आणि विकासाच्या मार्गापासून भरकटवले होते.’

आपल्या याचिकेत सावरकर लिहितात, ‘जर सरकार आपल्या असीम सद्भावना आणि दयाबुद्धीने माझी सुटका करत असेल तर मी संविधानवादी विकासाचा कट्टर समर्थक राहील आणि इंग्रजी सरकारला माझी निष्ठा अर्पण करून टाकीन, अशी मी हमी देतो. तिच विकासाची पहिली अट आहे. जोपर्यंत आम्ही तुरूंगात आहोत, तोपर्यंत महामहिमाच्या शेकडो- हजारो निष्ठावान प्रजेच्या घरांमध्ये खरा हर्ष आणि सुख येऊ शकत नाही. कारण रक्ताच्या नात्यापेक्षा मोठे दुसरे नाते असत नाही. जर आमची सुटका केली तर लोक आनंदाने आणि कृतज्ञतापूर्वकतेने सरकारच्या बाजूने घोषणा देतील, या सरकारला शिक्षा देणे, बदला घेण्यापेक्षाही जास्त माफ करणे आणि सुधारणेची संधी देणे चांगलेच अवगत आहे.’

 याचिकेच्या दुसऱ्या भागात आणखी भारतीयांना सरकारच्या बाजूने उभे करण्याचीही हमी देताना सावरकर लिहितात,‘ या पुढे जाऊन संविधानवादी मार्गाने माझा धर्म-परिवर्तन भारत आणि भारताबाहेर रहात असलेल्या भरकटलेल्या त्या सर्व तरूणांना योग्य मार्गावर आणेल, जे मला आपल्या मार्गदर्शकाच्या रुपात पहात होते. मी भारत सरकारची जशी इच्छा असेल तशी सेवा करायला तयार आहे. कारण जसे हे माझे मतपरिवर्तन अंतरात्म्याचा आवाज आहे, त्याचप्रमाणे माझा भविष्यातील व्यवहारही राहील. मला तुरूंगात ठेवून तुमचा होणारा फायदा हा मला तुरूंगातून सोडून दिल्यानंतर होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत तर काहीच नाही. जो शक्तिमान आहे, तोच दयाळू असू शकतो आणि एक होतकरू पुत्र सरकारच्या दरवाज्याखेरीज अन्य कुठे जाऊ शकतो. आशा आहे हुजूर, माझ्या याचनांवर दयाळूपणे विचार कराल.’

अशा कारस्थानांमध्ये सहभागी आणि दयेची मागणी करणारा असा माफीनामा लिहून देणारे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या अगदी विपरित इंग्रजी सैन्यात भारतीयांची भरती करण्यासाठी मदत करणारे सावरकर ‘वीर’ कसे ठरतात? सावरकरांनी भारताला हिंदुत्वाची अशी विचारसरणी दिली, जी लोकशाही मूल्यांच्या विरपित एका धर्माच्या वर्चस्वाची वकिली करते. एवढेच काय ते सावरकरांचे योगदान!

साभारः द वायर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा