यूपीएच्या अध्यक्षपदात मला रस नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाहीः शरद पवार

0
61
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे म्हणजेच यूपीएचे अध्यक्ष होणार का? हा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्याबाबत खुद्द पवारांनीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यूपीएच्या अध्यक्षपदात मला अजिबात रस नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही, असे पवार म्हणाले.

‘मरतुकडा’ झालेला विरोधी पक्ष मजबुत करण्यासाठी शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद आल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. त्यावर शिवसेना यूपीएमध्ये नसल्यामुळे त्यांनी नेतृत्वाबद्दल सल्ले देऊ नये, अशा शब्दांत शिवसेनेला काँग्रेसने फटकारले होते. यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे जाणार अशी चर्चा सुरू झालेली असतानाच पवारांनी ही शक्यता आधीही फेटाळून लावली होती.

आज पुन्हा पवारांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट शब्दांत सांगितली. मला यूपीएच्या अध्यक्षपदात रस नाही. माझ्याकडे तितका वेळ नाही आणि माझी तशी कुठली इच्छाही नाही. शिवाय असा कुठलाच प्रस्तावही नसल्याचे शरद पवार यांनी न्यूज १८ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

यूपीएचे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नव्हे-चिदंबरमः  ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही याबाबतची भूमिका मांडली आहे. यूपीएचे अध्यक्ष होण्याची शरद पवार यांची इच्छा असेल असे मला वाटत नाही. हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वतः शरद पवार यांचीही यूपीएचे अध्यक्ष म्हणून जाहीर व्हावे अशी इच्छा नसावी. जेव्हा बैठक होईल, तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. आम्ही काही पंतप्रधानांची निवड करत नाही आहोत, असे चिदंबरम म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा