मला अरेस्ट-बिरेस्ट झालीच नाहीः केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा

0
263
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अशोभनीय विधान केल्यामुळे वादात सापडलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्याला अटक बिटक झालेलीच नाही, असा दावा आज केला.

 नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन हे माहीत नाही. निदान त्यांनी सचिवाला तरी विचारायला हवे होते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती, असे राणे म्हणाले होते. राणेंच्या या विधानावर मंगळवारी महाराष्ट्रात रणकंदन माजले. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंचा निषेध केला.

नाशिक, महाड, पुणे अशा विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राणेंना रत्नागिरी पोलिसांनी गोळवली येथून अटक केली. तिथून राणेंना महाड कोर्टातून जामीन मिळेपर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. मंगळवारी रात्री उशिरा राणेंना जामीन मिळाला होता. आज मुंबई उच्च न्यायालयाने राणेंवर १७ सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई करू नये, असा दिलासा दिल्यानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले.

मला अटक झालीच नाही, असा दावा करताना राणे म्हणाले की, माझ्याविरुद्ध आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जी कलमे लावली होती, त्यानुसार मला कोर्टात हजर करावे लागेल, असे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी विनंती केली. त्यावर मी सहकार्य केले. अरेस्ट बिरेस्ट काही नाही. संगमेश्वरहून महाडपर्यंत मी माझ्या गाडीने प्रवास केला. हवे तर तुम्ही तपासू शकता. मी तुम्हाला माझ्या गाडीचा नंबर देतो. कोर्टात जाईपर्यंत मला कोणी अटक केली नाही, असा दावा राणे यांनी या पत्रकार परिषदेत केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा