उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार, फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा भंडाफोड करणारः मलिक

0
65
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः क्रूझवरील ड्रग्ज पार्टी आणि अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणात झालेली अटक यावरून तापलेले महाराष्ट्राचे राजकारण शांत व्हायला काही तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्या सकाळी १० वाजता आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा भंडाफोड करणार असल्याचे मलिक यांनी आज जाहीर केले आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मुंबई आणि महाराष्ट्रात अंडरवर्ल्डचा मोठा खेळ चालायचा. फडणवीस यांनी अंडरवर्ल्डला हाताशी धरून या मुंबई शहराला ओलीस ठेवले होते. एक आंतरराष्ट्रीय डॉन तेव्हा भारतात आला होता. याबाबत तपशीलवार माहिती मी उद्या देणार आहे, असा थेट इशाराच नवाब मलिक यांनी दिला आहे.

हेही वाचाः बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतलीः देवेंद्र फडणवीस

नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली असा आरोप फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला. फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेनंतर मलिकांनी ‘मैं आ रहा हूं’ असे आधी ट्विट केले आणि नंतर पत्रकार परिषद घेतली.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 दिवाळीनंतर मी सुतळी बॉम्ब फोडणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु त्यांचे फटाके भिजले आणि त्याचा आवाजच येऊ शकला नाही. नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध आहेत, असा माहोल तयार केला गेला. त्यासाठी काही कागदपत्रे समोर आणली. पण त्यांना ज्यांनी कुणी माहिती पुरवली आहे, ते कच्चे खिलाडी आहेत. तुम्ही सांगितले असते तर मीच तुम्हाला ही कागदपत्रे दिली असती. यापेक्षा आणखीही बरीच कागदपत्रे आहेत, तीही उपलब्ध करून दिली असती, अशा शब्दांत नवाब मलिकांनी फडणवीसांच्या दाव्याची खिल्ली उडवली.

फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केलाच आहे तर मी आज सारं काही सांगणार नाही. पण उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीस आणि अंडरवर्ल्डचा काय खेळ महाराष्ट्रात चालला होता. त्यांनी अंडरवर्ल्डच्या माध्यमातून पूर्ण मुंबई शहराला कसे ओलीस ठेवले होते, याची माहिती मी उद्या देणार आहे, असे सांगून मलिक यांनी खळबळ उडवून दिली. त्यामुळे मलिक उद्या नेमके काय सांगणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 फडणवीस यांची जवळची माणसे प्लॉट हडप करण्याचे धंदे कोणत्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून करत होते?  कोणता आंतरराष्ट्रीय डॉन तेव्हा विदेशातून भारतात आला होता? तो कुणासाठी काम करत होता? हे सर्व मी देशासमोर ठेवणार आहे, असे मलिक म्हणाले.

फडणवीस बॉम्ब फोडणार होते, पण ते फोडू शकले नाहीत. पण मी मात्र उद्या मुंबईत हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. अंडरवर्ल्डच्या दबावातून किंवा बॉम्बस्फोटातील आरोपीकडून कुर्ला येथील जागा आम्ही घेतलेली नाही. जे काही व्यवहार झाले आहेत, त्याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत. याची चौकशी एनआयएने करू द्या नाहीतर सीबीआयने. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही, असे आव्हानही मलिक यांनी फडणवीसांना दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा