देशाचे माजी सरन्यायाधीशच म्हणतातः मी कोर्टात जाणार नाही, तेथे न्याय मिळणार नाही!

0
1680
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य देशाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांनी केले आहे. न्यायालयात कोण जाते? तुम्ही न्यायालयात जाल तर पश्चाताप करत बसाल, असेही गोगोई यांनी म्हटले आहे.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना रंजन गोगोई यांनी केलेल्या या धक्कादायक विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. न्यायालयात कोण जाते?  मोठ्या कॉर्पोरेट्सना न्यायालयात जाण्याची संधी घेणे परवडते. इतरांना नाही. तुम्ही जर न्यायालयात गेलात तर तुम्ही तुमच्या मळक्या गोधड्या धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही, असे गोगोई म्हणाले. गोगोई यांनी त्यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपाचा निवाडा स्वतःच केला होता, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यीं लोकसभेत केला होता. त्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का, असा प्रश्न गोगोई यांना विचारण्यात आला होता. त्यावर गोगोई यांनी हे उत्तर दिले.

एक संवैधानिक संस्था म्हणून न्यायपालिका किती महत्वपूर्ण आहे, हे वेगळा जोर देऊन सांगण्याची गरज नाही. तुम्हाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हवी आहे, परंतु तुमची न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वच संस्थांची उत्पादकता घटलेली असताना न्यायव्यवस्था मात्र प्रकरणे हातावेगळी करण्यात यशस्वी झाली. महामारीच्या काळात कनिष्ठ न्यायालयात ६० लाख, उच्च न्यायालयात ३ लाख आणि सर्वोच्च न्यायालयात ७ हजार खटले दाखल झाले, असेही गोगोई म्हणाले.

न्यायव्यवस्था भक्कम करण्यासाठी रोडमॅपची आवश्यकताही गोगोई यांनी बोलून दाखवली. माझ्या डोक्यात असलेला रोडमॅप म्हणजे कामासाठी योग्य व्यक्तीची निवड. प्रशासनामध्ये तुम्ही अधिकाऱ्याची ज्या पद्धतीने निवड करता, तशी न्यायाधीशांची निवड केली जात नाही. न्यायाधीश ही पूर्णवेळ वचनबद्धता असते. कामांचे तास निश्चित नाहीत. ही चोवीस तासांची नोकरी आहे. तुम्ही पहाटे दोन वाजता उठता. एखादा मुद्दा आठवता आणि टिपून ठेवता. न्यायाधीशाचे काम असे चालते. किती लोकांना हे माहीत आहे?, असे गोगोई म्हणाले.

गोगोईंचे वक्तव्य चिंता वाटायला लावणारे-पवारः दरम्यान, गोगोई यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे. देशाची न्यायव्यवस्था उच्च आहे, असे गेल्या आठवड्यात माझ्या वाचनात आले होते. न्यायाधीशांसोबत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी हा उल्लेख केला होता. त्याबद्दल आनंद झाला होता. पण गोगोई यांचे विधान धक्कादायक आहे. न्यायव्यवस्थेबाबत त्यांनी त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला का हे मला ठावूक नाही, असे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा