योग्यवेळी ‘सीडी’ लावणारचः एकनाथ खडसेंचा भाजपला पुन्हा इशारा

0
983
संग्रहित छायाचित्र.

जळगावः तुम्ही माझ्या ईडी लावली तर मी सीडी लावीन, असा इशारा भाजप नेत्यांना देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी योग्यवेळी सीडी लावण्याचा इशारा पुन्हा एकदा दिला आहे.

तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावीन, असा एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच दिला होता. खडसेंची ईडीकडून चौकशी झाली तरी त्यांनी अद्याप सीडी बाहेर काढली नाही. त्यावरून त्यांना अनेकवेळा डिवचण्यातही आले होते. खडसे यांनी आज सीडीबाबत पुन्हा भाष्य केले असून मी योग्यवेळी सीडी लावणार आहे, असे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावीन असे मी म्हणालो होतो, हे खरे आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलिस त्या सीडीची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असे खडसे म्हणाले.

गेल्या चाळीस वर्षांत माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणीही माझ्याविरोधात बोलले नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतुतः आरोप करण्यात आले आहे. न्यायालयानेही आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? म्हणूनच ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असे खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी भाजपला जय श्रीराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी तुम्ही माझ्या मागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावीन, असा इशारा भाजप नेत्यांना दिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा