भारतात त्वरित आणि संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्यायः अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांचे मत

0
169
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारतातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे जगाची चिंता वाढवलेली असतानाच भारतातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काही आठवडे त्वरित आणि संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे मत प्रसिद्ध साथरोगतज्ज्ञ आणि अमेरिकी सरकारचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी व्यक्त केले आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून नुकत्याच केलेल्या भाषणात लॉकडाऊनकडे शेवटचा पर्याय म्हणून पहा, असा सल्ला राज्यांना दिला होता. मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर द्या म्हणजे लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही, असेही मोदींनी राज्यांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. फॉसी यांचा हा सल्ला महत्वाचा मानला जात आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत डॉ. फॉसी यांनी भारतात काही आठवडे त्वरित आणि संपूर्ण लॉकडाऊन लागू केला तर कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले जाऊ शकते, असे म्हटले आहे. भारतात ज्या पद्धतीने कोरोना संसर्गाचा फैलाव होत आहे, त्यामुळे रुग्णांना बेड्स आणि ऑक्सीजनसाठी झगडावे लागत आहे. औषधांचा काळाबाजार सुरू आहे. लोक आणि प्रशासन हतबल झाले आहेत, असे डॉ. फॉसी म्हणाले.

 नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या संसर्गामुळे भारत सध्या मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. अशा स्थितीत त्वरित काय करता येऊ शकते? काही आठवडे संपूर्ण लॉकडाऊन हाच देशासमोर एकमेव पर्याय उपलब्ध राहतो, असे डॉ. फॉसी यांनी म्हटले आहे. औषधे आणि ऑक्सीजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय समितीची गरज असल्याचेही फॉसी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा