‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तक मागे घ्या, अन्यथा वेगळे परिणामः संभाजीराजेंचा भाजप अध्यक्ष अमित शाह यांना इशारा

0
297
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उठली असतानाच या वादात आता शिवरायांच्या वंशजांनीही उडी घेतली आहे. ज्या पक्ष कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तत्काळ मागे घ्यावे, नाही तर त्याचे वेगळे परिणाम होतील, असा इशारा शिवरायांचे वंशज आणि भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना नाव न घेता दिला आहे.

दिल्ली भाजपच्या कार्यालयात आयोजित धार्मिक-सांस्कृतिक संमेलनात प्रमुख भाजप नेत्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ‘सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला… काही तरी बोला…’ असे खुले आव्हान दिले होते. विशेष म्हणजे शिवरायांचे हे तिन्ही वंशज सध्या भाजपमध्ये आहेत आणि त्याच भाजपने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करणाऱ्या पुस्तकाचे थाटामाटात प्रकाशन केले आहे.

हेही वाचा: शिवरायांच्या वंशजांनो बोला…. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ वादावर उदयन, संभाजीराजेंना आव्हान

महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या ज्वाज्वल्य स्वाभिमानाचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवरायांची कुणाशी तरी तुलना केल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात असतानाच शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणे खपवून घेतले जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत. पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणे माझ्यासहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेले नाही. ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तत्काळ मागे घ्यावे. नाही तर त्याचे वेगळे परिणाम होतील, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली भाजपच्या कार्यालयात झाले आणि अमित शाह हे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे जगजाहीर असूनही संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र भाजप किंवा अमित शाह यांचे नाव घेणे मात्र पद्धतशीरपणे टाळले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा