अमेरिकेच्या संसदेत डोनाल्ड ट्रम्पविरुद्ध अखेर महाभियोग प्रक्रिया सुरू

0
48
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः सत्ता हस्तांतरण प्रक्रियेला हिंसक वळण दिल्याचा आरोप असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरु झाली आहे. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजेच प्रतिनिधी सभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा एक आणि डेमॉक्रेटिक पक्षाच्या दोन अशा तीन सदस्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग दाखल केला. ट्रम्प यांच्या विरोधात आणखी एक प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्यात अमेरिकेच्या २५ व्या घटना दुरुस्तीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवून त्यांचे सर्वाधिकार उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन वेळा महाभियोग दाखल झालेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

सीएनएनने दिलेल्या बातमीनुसार, ट्रम्प यांनी देशाविरुद्ध बंडाला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत महाभियोग दाखल करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिका आणि अमेरिकेच्या सरकारी संस्थांना धोका निर्माण केला आहे. सत्तेच्या शांतातपूर्ण हस्तांतरणात अडथळे आणून त्यांनी लोकशाही प्रक्रियाच धोक्यात आणली आहे आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, असे महाभियोग प्रस्तावात म्हटले आहे.

अमेरिकेच्या राज्यघटनेतील १४ वी घटना दुरुस्ती लागू करण्याची मागणी या महाभियोग प्रस्तावात करण्यात आली आहे. या घटना दुरूस्तीनुसार, जो कुणी अमेरिकेच्या विरोधात बंडाला चिथावणी देईल, त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रोड्स आयलँडमधून निवडून आलेले डेमॉक्रॅट डेव्हीड सिसिलीन, कॅलिफोर्नियाचे टेड लियू आणि मेरिलँडचे रिपब्लिकन सदस्य जेमी रस्कीन यांनी मिळून हा महाभियोग दाखल केला आहे. या महाभियोग प्रस्तावाला २०० हून अधिक सिनेटरचा पाठिंबा आहे. या प्रस्तावावर बुधवारी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यास अवघा आठवडा बाकी आहे.

२५ व्या घटना दुरुस्तीनुसारही प्रस्तावः ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या राज्यघटनेच्या २५ व्या घटना दुरुस्तीनुसारही एक प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यात ट्रम्प यांना पदावरून हटवून उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी त्यांचे सर्वाधिकार घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जर मानसिकदृष्ट्या तंदुरूस्त नसेल किंवा ते आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात अपयशी ठरले किंवा आपल्या अधिकाराचा वापर करण्यास सक्षम नसतील तर त्यांना पदावरून हटवून उपराष्ट्राध्यक्ष त्यांचे सर्व अधिकार स्वतःकडे घेऊ शकतात. हे अधिकार घेतल्यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने या प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा