उपमुख्यमंत्री अजित पवारांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस, ठाकरे सरकारला मोठा झटका

0
160
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यापाठोपाठ महाविकास आघाडी सरकारला दुसरा मोठा धक्का बसला आहे. इन्कम टॅक्स (प्राप्तिकर) विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस बजावली आहे. इन्कम टॅक्स विभागाने अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश जारी केल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. हे आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्राप्तिकर विभागाने पवारांना ही नोटीस पाठवली आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

पवारांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यासंबंधातील नोटीस पवार यांना पाठवण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. कालच किरिट सोमय्यांनी अजित पवारांकडे हजार कोटींहून अधिकची बेनामी संपत्ती असल्याचा आरोप केला होता. सोमय्यांनी अजित पवार यांची आई, पत्नी आणि त्याच बरोबर पवार कुटुंबीयांच्या जावयाचाही हात असल्याचा आरोप केला होता.

मागील काही दिवसांपासून अजित पवार हे इन्कम टॅक्सच्या रडारवर आहेत. इन्कम टॅक्स विभागाने पवार यांच्या बहिणींच्या घरी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयातही छापेमारी केली होती. त्यानंतर आज ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

आता अजित पवारांना ९० दिवसांच्या कालावधीत इन्कम टॅक्स विभागाने नोटीस बजावलेली संपत्ती बेनामी नसल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. अजित पवारांशी संबंधित पाच संपत्तीवर इन्कम टॅक्सने जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. ही संपत्ती एक हजार कोटींहून जास्त असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांशी निगडीत जरंडेश्वर कारखाना ( जवळपास ६०० कोटी), दक्षिण दिल्लीतील फ्लॅट ( जवळपास २० कोटी), पार्थ पवार यांचे मुंबईतील कार्यालय ( जवळपास २५ कोटी), गोव्यातील रिसॉर्ट ( जवळपास २५० कोटी) आणि राज्यातील वेगवेगळ्या २७ जिल्ह्यातील जमिनी (जवळपास ५०० कोटी) अशी ही संपत्ती असल्याचे सांगण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा