भारताची सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी, शेतकरी संघटनेचा मात्र विरोध

0
38

नवी दिल्लीः देशात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

परदेश व्यापार विभागाचे महासंचालक आणि भारत सरकारचे पदसिद्ध सचिव अमित यादव यांच्या स्वाक्षरीने आजच याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बेंगलोर रोझ आणि कृष्णपुरम कांद्यासह सर्व प्रकारच्या  प्रजातीच्या कांद्यावर ही निर्यात बंदी लावण्यात आली असून कापलेला कांदा, स्लाइस किंवा कांद्याची पावडर मात्र या निर्यातबंदातून वगळण्यात आली आहे.

 कोरोना संसर्गाच्या काळात देशातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. एप्रिल ते जून या काळात देशातून १९.८ कोटी डॉलर किंमतीच्या कांद्याची निर्यात केली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढल्यामुळे सप्टेंबर २०१९ मध्ये देशभरात कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या. त्याहीवेळी मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता.

देशात महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. त्यापैकी कर्नाटकात भाजपचीच सत्ता आहे. तर महाराष्ट्रात बिगर भाजप महाविकास आघाडीची सत्ता आहे. परंतु कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रात कांदा उत्पादन अधिक होते. भारतातून बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात, मलेशिया आणि श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होतो.

शेतकरी संघटना करणार आंदोलनः कांदा आवश्यक वस्तूच्या कायद्यातून काढलेला असताना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. हे बेकायदेशीर आहे. याचा निषेध करण्यासाठी व केंद्र सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी उद्या सकाळपासून जिथे जमेल तेथे, बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरु करा. बातमी येताच २७  रुपये किलोने ठोक विकणारा कांदा ७ रुपयावर आला आहे. सरकारला धडा शिकवण्यासाठी उद्य‍ाच आंदोलनाला सुरुवात करा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा