भूकेची परिस्थिती गंभीरः जागतिक भूक निर्देशांकात भारत ९४ व्या स्थानी, पाकिस्तानपेक्षाही वाईट स्थिती

0
133
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे दिवास्वप्न पाहणाऱ्या भारतातील भूकेची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. जागतिक भूक निर्देशांकात १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या स्थानी आहे. भारताची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे हा अहवाल सांगतो आहे.

कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्ट हंगर हिल्फी या दोन संस्थांनी या वर्षीचा जागतिक भूक निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात भारत ९४ व्या स्थानी आहे. २०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या यादीत १०२ व्या स्थानी होता तर २०१८ मध्ये ११९ देशांच्या यादीत १०३ व्या यादीत होता. म्हणजेच भारतातील उपासमार दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

 विशेष म्हणजे जागतिक भूक निर्देशांकात भारताची परिस्थिती नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेश आणि इंडोनेशियापेक्षाही वाईट आहे. जगातील फक्त १३ देशांचीच परिस्थिती भारतापेक्षा वाईट आहे.

 जागतिक भूक निर्देशांक निश्चित करताना पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, बाल मृत्युदर, कुपोषण, कमी पोषण आणि उंचीच्या तुलनेत कमी वजन असे घटक विचारात घेतले जातात. या निर्देशांकात परिस्थितीनुसार ० ते १०० गुण दिले जातात. शून्य गुण मिळाल्यास त्या देशाची परिस्थिती सर्वोत्तम मानली जाते. भारताला ५० पैकी २७.२ गुण मिळाले असून देशातील भूकेची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

भारत नेमका कुठे?

स्थानदेश२०२०चे गुण
१-१७*चीन<५
६४श्रीलंका१६.३
७३नेपाळ१९.५
७५बांग्लादेश२०.४
७८म्यानमार२०.९
८८पाकिस्तान२४.६
९४भारत२७.२
९९अफगाणिस्तान३०.३

दरम्यान, जागतिक भूक निर्देशांकाच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आपल्या खास मित्रांचे खिसे भरण्यातच मश्गुल असल्यामुळे भारतातील गरीब भूकेला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा