महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू, घराबाहेर पडणाऱ्यांच्या धरपकडीसाठी पोलिसांची विशेष पथके

0
81

मुंबईः कोरोना विषाणुच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. राज्याच्या नागरी भागात काल मध्यरात्रीपासून जमावबंदीची अंमलबजावणीही सुरू झाली असून घरातच राहण्याचे निर्देश असूनही घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

कोरोनाशी दोन हात करण्याच्या संकल्पाप्रति कटिबद्धता दाखवून देण्यासाठी रविवारी १४ तासांची जनता संचारबंदी यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली असून परदेशातून आलेल्या आणि १४ दिवस होम क्वारंटाइन निर्देश असलेल्या नागरिकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. अशा नागरिकांची यादी  पुणे आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली असून त्यांची पडताळणी करण्याची जबाबदारीही पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. होम क्वारंटाइनचे निर्देश असूनही असे नागरिक घराबाहेर पडले तर त्यांना पकडून रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी मुंबईत १३ पथके स्थापन करण्यात आली आहेत. १४ दिवस विलगीकरणाची सक्ती केलेल्यापैकी कोणी बाहेर पडलेच तर त्याच्याविरुद्ध आता सक्तीने कारवाईही केली जाणार आहे.

कलम १४४ चे उल्लंघन केल्यास अटक आणि वर्षभर तुरूंगवासः महाराष्ट्राच्या नागरी भागात भारतीय फौजदारी दंड संहितेतील कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे कलम लागू करण्यात आले असल्यामुळे या कलमाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा त्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला पोलिस अटक करू शकतात. फौजदारी दंड संहितेतील कलम १० किंवा कलम १५१ अंतर्गत अटकेची ही कारवाई केली जाते. कलम १४४ अंतर्गत एक वर्षे तुरूंगवास आणि दंडाची शिक्षाही होऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा