कोरोनाशी युद्धपातळी लढण्यास सज्ज रहाः सैन्याला आदेश, आपत्कालीन आर्थिक अधिकारही बहाल

0
167
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः देशात दररोज चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या आढळू लागल्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली असतानाच केंद्र सरकारने भारतीय लष्कराला कोरोनाशी युद्धपातळीवर लढण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने लष्कराला आपत्कालीन आर्थिक अधिकारही बहाल केले आहेत. त्यामुळे लष्कराला त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येतील आणि क्वारंटाइन सेंटरच्या उभारणीबरोबरच आपत्कालीन आरोग्य सेवाही देता येऊ शकतील.

भारतीय शसस्त्र सैन्य दलाला आपत्कालीन आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार बहाल करण्यात आल्यामुळे लष्कराला कोविड रुग्णालये उभारणे, ती चालवणे, क्वारंटाइन केंद्रे उभारणे आणि कोणत्याही मंजुरीशिवाय कोरोना उपचाराशी संबंधित उपकरणांची खरेदी करण्याची सूट मिळाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज,शनिवारी ही घोषणा केली. सशस्त्र सैन्य दलाचे अधिकार वाढवण्यासाठी आणि कोरोनाविरुद्धच्या देशव्यापी लडाईतील त्यांच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी विशेष तरतुदींचा वापर करण्यात आला आहे. सशस्त्र सैन्याला आपत्कालीन आर्थिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

या निर्णयाअंतर्गत कोअर कमांडर अथवा एरिया कमांडरना प्रत्येक प्रकरणात ५० लाख रुपयांपर्यंत आणि डिव्हीजन कमांडर, सब एरिया कमांडरना २० लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्याचे आपत्कालीन अधिकार देण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

हे आपत्कालीन आर्थिक अधिकार मिळाल्यामुळे भारतीय लष्कर कोरोनाशी संबंधित केंद्रे चालवू शकतील. आवश्यक उपकरणांची खरेदी आणि संसाधनाची जमावजमव करण्याचे कामही वेगाने होऊ शकेल. त्याशिवाय कोणतीही आपत्कालीन जबाबदारी पार पाडण्यास तयार राहू शकतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा