सैन्यात अधिकारी व्हायचेय? जाणून घ्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया!

0
136
संग्रहित छायाचित्र.

राज्यातील अधिकाधिक  विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने सन १९७७ मध्ये औरंगाबाद येथे मुलांसाठीची सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. आपल्या देशाच्या सेवेसाठी आजपर्यंत साडेपाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी संरक्षण दलातील विविध विभागात अधिकारी म्हणून या संस्थेच्या माध्यमातून मिळाले आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संस्थेव्दारे घेण्यात येणारी पात्रता परीक्षा देतात. यातील गुणवत्ता यादीनुसार साधारण तीनशे विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येवून छाणनी अंती केवळ ६० विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. त्यानंतर दोन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये  (एनडीए) प्रवेशास पात्र ठरतो आणि सोबतच परीक्षा पास होण्याचीही शक्यता वाढते. पुढील वर्षाच्या प्रवेशासाठीही या संस्थेकडून राज्यभरातून  सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण ४६ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी पात्र व इच्छूक विद्यार्थ्यांना २४ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज दाखल करता येईल.

आवश्यक पात्रताः या  प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार हा अविवाहित मुलगा असावा. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याचा जन्म ०२ जानेवारी २००६ ते ३१ डिसेंबर २००७ च्या दरम्यान झालेला असावा. तो मार्च/ एप्रिल/मे २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असावा. म्हणजेच जून २०२२ मध्ये इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. तसेच उमेदवार हा सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. यूपीएससीद्वारे  पुण्याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि  केरळच्या एझिमला येथील भारतीय नौसेना प्रबोधिनी (आय.एन.ए.) येथील प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेल्या शारिरीक निकषास पात्र असावा. हे निकष यूपीएससी तथा औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

शारीरिक पात्रताः उमेदवाराची उंची १५७  सेंटीमीटर., वजन ४३ किलोग्रॅम, कमीत कमी छाती न फुगवता-७४ सेंटीमीटर, फुगवून-७९ सेंटीमीटर, रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा. चष्मा (-) 2.0 D पेक्षा जास्त नसावा.

लेखी परीक्षेचे स्वरुपः औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून १३ फेब्रुवारी २०२२ रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत १५० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील. त्यामध्ये गणिताचे ७५ आणि सामान्य ज्ञानावर ७५ गुण आधारित असतील. लेखी परीक्षा साधारणतः  इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रत्येक योग्य उत्तराला १ गुण मिळेल व प्रत्येकी चुकीच्या उत्तराला ०.५ गुण वजा केले जातील. यशस्वी परीक्षार्थींना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवाराची मुलाखत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येतील.

परीक्षा शुल्कः इच्छूक उमेदवारांना www.spiaurangabad.com या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येईल. ४५० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, किंवा नेट बँकींग इत्यादी द्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलान द्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. उमदेवारांना परीक्षेचे हॉल तिकीट ०७ फेब्रुवारी २०२२ रोजी संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. परीक्षा संबंधीत सूचनांसाठी वेळोवेळी www.spiaurangabad.com  या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे संचालक अमित दळवी कर्नल (निवृत्त) यांनी केले आहे.

मुलांप्रमाणेच मुलीही देश सेवेची संधी मिळण्यास पात्र होण्यासाठी या संस्थेप्रमाणेच मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था असावी या मागणीचा सकारात्मक विचार करून औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या धर्तीवर नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठित करण्यात आली आहे. नाशिक येथे मुलींसाठीही सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र लवकर सुरु झाल्यास महिलांनाही देश सेवेची संधी मिळणार आणि संरक्षण दलात महिलांचे प्रमाणही वाढणार हे मात्र नक्की…..

  • रेखा पालवे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा