गायत्रीमंत्र जपाने कोरोनावर झटपट उपचारः विज्ञान मंत्रालयाने दिला क्लिनिकल ट्रायलसाठी निधी!

0
200

नवी दिल्लीः कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ विविध शास्त्रीय संशोधन करून माणसाचे जीव सुरक्षित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतानाच भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मात्र गायत्रीमंत्र या धार्मिक स्त्रोताचा जप आणि प्राणायाम केल्याने कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे होऊ शकतात का, हे निर्धारित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ऋषीकेशच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) काही रुग्णांवर गायत्रीमंत्राचा जप आणि प्राणायामाचे क्लिनिकल ट्रायल घेतले जाणार आहेत. समजा गायत्रीमंत्र जपाचे हे क्लिनिकल ट्रायल यशस्वी झालेच तर ती मोदी सरकारची मोठी उपलब्धी ठरणार असून जगभरात गायत्रीमंत्र जप करून घेणाऱ्यांना मागणीही वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्रीमध्ये या नैदानिक चाचणीची अधिकृतपणे नोंद करण्यात आली आहे. कोरोनाची मध्यम लक्षणे असलेल्या २० रुग्णांवर ऋषिकेशच्या एम्समध्ये गायत्रीमंत्र जप आणि प्राणायामाचे क्लिनिकल ट्रायल घेतले जाणार आहेत. या क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी करून घेतलेल्या रुग्णांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे. एका गटावर प्रमाणित शास्त्रीय उपचार केले जाणार आहेत. तर दुसऱ्या गटावर प्रमाणित उपचाराबरोबरच त्यांना १४ दिवस गायत्रीमंत्राचा जप करायला लावला जाणार आहे आणि प्रमाणित योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली प्राणायामही करायला लावला जाणार आहे. ‘द हिंदू’ने हे धक्कादायक वृत्त दिले आहे.

१४ दिवसांच्या क्लिनिकल ट्रायलनंतर ज्या गटातील रुग्णांनी गायत्रीमंत्राचा जप आणि प्राणायाम हा अतिरिक्त उपचार घेतला आहे, त्यांची तुलना प्रमाणित उपचार घेतलेल्या रुग्णांशी केली जाणार आहे. गायत्रीमंत्राचा जप केलेल्या रुग्ण आणि केवळ प्रमाणित उपचार घेतलेल्या रुग्ण यांच्या पेशींवरील सूज किंवा पेशींची हानी कशा प्रमाणात आहे, याची पडताळणी केली जाणार आहे. शरीरात कोरोना विषाणूचा प्रवेश झाल्यानंतर रोगप्रतिकारक प्रणाली ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देते, त्यामुळे पेशींवर सूज येते किंवा त्यांचे नुकसान होते. असे होणे प्राणघातकही ठरू शकते. विषाणूकोरोनाबाधित रुग्ण गंभीर होण्याच्या अनेक कारणांपैकी पेशींवर येणारी सूज किंवा त्यांचे नुकसान हेही एक कारण आहे. यासाठी अनेक थेरपी उपलब्ध असून अद्याप एकही औषध यावर प्रभावी सिद्ध होऊ शकलेले नाही.

गायत्रीमंत्राचा जप किंवा प्राणायामाचा गंभीर कोरोनाबाधित रूग्णांवर काही फरक पडतो का, बाबत मात्र या क्लिनिकल ट्रायलमध्ये अभ्यास केला जाणार नाही. गायत्रीमंत्राचा जप आणि प्राणायाम केलेले रुग्णांना निगेटिव्ह येण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्यांचा रुग्णालयातील मुक्कामाचा कालावधी यात काही फरक आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यांचा थकवा किंवा चिंता कमी झाली का, हेही पडताळूण पाहिले जाणार आहे.

या क्लिनिकल ट्रायलसाठी रुग्णांची भरती करणे सुरू केले आहे. एम्समध्ये योगावर संशोधन केलेल्या पोस्ट डॉक्टरल संशोधकाला या क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. पुढील दोन-तीन महिने आम्ही याची पडताळणी करणार आहोत, असे एम्सच्या असोसिएट प्रोफेसर आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. रुची दुआ यांनी द हिंदूशी बोलताना सांगितले.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कोरोनावरील उपचाराशी संबंधित उपचार पद्धती, औषध आणि इंरटव्हेन्शन्स विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी खुले अर्ज मागवले होते. डॉ. रूची दुआ यांनी त्यासाठी अर्ज केला आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांना गायत्रीमंत्राचा जप आणि प्राणायामाचे क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी ३ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा