किर्तनकार इंदुरीकर महाराज वैतागले; म्हणाले बस्स झाले, किर्तन सोडून शेती करणार!

0
470
संग्रहित छायाचित्र.

बीड/ अहमदनगर: पुत्रप्राप्तीसाठी समविषम तिथीचा फॉर्म्युला सांगून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले प्रसिद्ध किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज त्यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादामुळे चांगलेच वैतागले असून दोन तासांच्या किर्तनात एखादे वाक्य चुकीचे जाऊ शकते. एक दोन दिवस वाट पाहीन आणि हे सगळे थांबले नाही तर किर्तन सोडून थेट शेती करीन, अशी हताश प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

परळी येथे किर्तन करताना इंदुरीकर महाराज यांनी आपली उद्विग्नता बोलून दाखवली मात्र पुत्रप्राप्तीच्या फॉर्म्युल्यावर ते अद्यापही ठाम असल्याचे त्यांच्या किर्तनातून स्पष्ट झाले.पुत्रप्राप्तीबद्दल मी जे काही बोललो आहे, ते सगळे ग्रंथात लिहिलेले आहे. मी जे बोललो, ते चुकीचे नाही. पण त्यामुळे जो वाद निर्माण झाला आहे, त्यामुळे मला खूप त्रास झाला आहे.दोन दिवसांत माझे वजनही कमी झाले आहे. एकदोन दिवस बघेन आणि वाद थांबला नाही तर किर्तन सोडून शेती करेन, असे इंदुरीकर म्हणाले.

खासगी बाऊन्सरची सुरक्षा घेऊन किर्तनालाः पुत्रप्राप्तीच्या वादामुळे इंदुरीकर महाराजांनी आता खासगी बाऊन्सरची सुरक्षा घेतली आहे. आज शनिवारी ते बाऊन्सरच्या सुरक्षेतच अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे किर्तनाला आले होते. त्यांच्या किर्तनाच्या व्हिडीओ शुटिंगलाही बंदी घालण्यात आली आहे.

खिल्ली उडवल्यामुळे शिक्षकही नाराजः पुत्रप्राप्तीचा वाद थांबत नाही तोच इंदुरीकर महाराजांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते वर्गात शिक्षक कसा वेळ वाया घालवतात, हे सांगताना दिसत आहे. 35 मिनिटांच्या तासिकेत शिक्षक पाच मिनिटे तर वर्गात जायलाच लावतात.त्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटे, आदल्यादिवशी काय शिकवलं ते सांगायला पाच मिनिटे आणि पुढच्या तासाला काय शिकवणार हे सांगायला पाच मिनिटे घालवतात. त्यानंतर मग तास संपला हे सांगायची वेळ येते, असे इंदुरीकर महाराज म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंदुरीकर महाराज स्वतःच शिक्षक आहेत, त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलीन करू नये, असे शिक्षकांनी त्यांना सूचवले आहे. किर्तनाचा हेतू प्रबोधनाचा असतो. मात्र शिक्षकांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणे अनाठायी आहे, असे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा