उद्योगपती पतीचा पत्नीने केला कौटुंबिक कलहातून खून, औरंगाबादेतील थरारक घटना

0
383
Newstown
खुनाच्या घटनेनंतर घटनास्थळाची पहाणी करताना पोलिसांचे पथक. इन्सेटमध्ये मृत शैलेंद्र राजपूत.

औरंगाबाद : औरंगाबादेतील उल्कानगरी या अत्यंत उच्चभ्रू वसाहतीत सोमवारी मध्यरात्री थरारक घटना घडली. कौटुंबिक कलहातून उद्योगपती पतीची पत्नीने चाकूने वार करून हत्या केली. हा भयंकर प्रकार सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास उल्कानगरी भागातील खिंवसरा पार्कमध्ये घडला. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने बेडरुम आणि स्वयंपाक खोलीतील फरशीवर सांडलेले रक्त तसेच रक्ताने माखलेले कापडे बाथरुममध्ये धूत पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिचा हा प्रयत्न सफल झाला नाही. रक्ताच्या थारोळे साचतच असल्याने तिने स्वत:च पतीच्या मित्राला खून झाल्याची माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन पत्नीला ताब्यात घेतले. शैलेंद्र शिवसिंग राजपूत (40, रा. फ्लॅट क्र. 702, खिंवसरा पार्क, ऑगस्ट होमच्या बाजूला, उल्कानगरी) असे मृत उद्योगपतीचे नाव आहे. तर पूजा शैलेंद्र राजपूत असे त्याच्या मारेकरी पत्नीचे नाव आहे.

कन्नड तालुक्यातील नागद येथील मूळचे शैलेंद्र राजपूत हे बऱ्याच वर्षांपासून औरंगाबादेत वास्तव्याला होता. शैलेंद्र यांचा भाऊ भरत हा माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. 2002 मध्ये शैलेंद्र यांचा पूजा यांच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसांपासूनच शैलेंद्र आणि पूजा यांच्या छोट्या-मोठ्या कारणावरुन भांडण व्हायचे. गेल्या काही वर्षांपूर्वी दोघेही विभक्तही झाले होते. मात्र, त्यानंतर दोन ते तीन वर्षांपासून ते पुन्हा एकत्र नांदत होते. त्यांना वैष्णवी आणि सान्वी अशा दोन मुली आहेत. मध्यंतरी पूजाने घरगुती कारणातून शैलेंद्र यांच्या आईविरुध्द देखील एका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती अशी माहिती मिळते. अशात दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होता. तक्रारीत शैलेंद्र यांचे भाऊ सुरेंद्र शिवसिंग राजपूत (46, रा. एच-5, कासलीवाल हेरिटेज, न्यू श्रेयनगर) ते तीन भाऊ आहेत. त्यापैकी थोरला भाऊ भरत राजपूत व धाकटा शैलेंद्र होता. हे तिघेही भाऊ वाळूज एमआयडीसी भागात हिरा पॉली प्रिंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एकत्रितपणे चालवतात. सोमवारी मध्यरात्री शैलेंद्र आणि पूजामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पूजाच्या डोक्याला आणि डोळ्याला तसेच पायाला मार लागला. दोघांचे बेडरुममध्ये भांडण सुरू असताना पूजाने स्वयंपाक खोलीतून चाकू आणत शैलेंद्रच्या दोन्ही जांघांच्या डाव्या बाजूला वार केला. यावेळी थोरली मुलगी मुलगी वैष्णवी (16) आणि धाकटी सान्वी (6) या दोघीही घरातच होत्या. चाकूचा वार झाल्यानंतर शैलेंद्र बेडरुममधून बैठक खोलीत येताच ते जमिनीवर कोसळले. यावेळी बेडरुम आणि स्वयंपाक खोलीत रक्ताचा सडा पडला होता. जमिनीवर कोसळलेल्या शैलेंद्र यांच्या आजूबाजूला रक्ताचे थारोळे साचले होते. ही भयंकर घटना घडल्यानंतर पूजाने शैलेंद्र यांचा मित्र निजाम यांना मोबाइलवरुन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सुरेंद्र यांना माहिती दिल्यावर ते पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले.

खुनानंतर पत्नीचे मौन : शैलेंद्र यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून तिला सुरेंद्र यांनी भांडणाचा जाब विचारला. तसेच भांडण सुरू असताना कुटूंबातील कोणत्याही सदस्याला त्याबाबत माहिती का दिली नाही. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात का नेले नाही, यावरही तिने याबाबत बोलणे टाळले.

रक्ताने कपडे बाथरुमममध्ये धुतले : शैलेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना पूजाने स्वत:च्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे आणि बेडरुम तसेच स्वयंपाक खोलीत साचलेले रक्त कपड्याने पुसले. त्यानंतर ही सर्व कापडे तिने बाथरुमममध्ये धुतली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी फ्लॅटचा ताबा घेतला. श्वान पथकासह फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले. यावेळी बाथरुमसह कमोडमध्येही रक्त होते.

शैलेंद्र बनावट नोटा प्रकरणातील संशयित : बनावट नोटा प्रकरणी शैलेंद्र राजपूतसह 12 जणांना शहर गुन्हे शाखेने जुलै-ऑगस्ट 2003 मध्ये अटक केली होती. याप्रकरणी 23 जुलै 2003 रोजी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातून शैलेंद्र राजपूतसह अन्य दोन ते तीन जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली होती. 2013-14 या काळात तत्कालीन गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्‍वर थोरात यांनी औरंगाबाद जिमखाना क्लबवर छापा मारून शैलेंद्रसह काही  जुगाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा