कोण होत्या ‘टाइम’च्या शतकातील १०० प्रभावी महिलांत समाविष्ट राजकुमारी अमृत कौर?

0
73
संग्रहित छायाचित्र.

‘टाइम’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने  गेल्या शतकातील १०० प्रभावी महिलांच्या यादीत दोन भारतीय महिलांचा समावेश केला आहे. त्यापैकी एक आहेत इंदिरा गांधी आणि दुसऱ्या आहेत राजकुमारी अमृत कौर. इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू जगाला चांगल्यापैकी माहीत आहे. मात्र राजकुमारी अमृत कौर यांच्याबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे.पंजाबच्या कपूरथळा राजघराण्याशी संबंधित राजकुमारी अमृत कौर यांच्या नावाची इतिहासाने जी नोंद घेतली आहे, ती उल्लेखनीय आहे. इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या पंतप्रधान होत्या तर राजकुमारी अमृत कौर देशाच्या पहिल्या आरोग्य मंत्री होत्या.

१९४७ पूर्वी अशा खूपच कमी राजकुमारी होत्या, त्यांनी सप्रयास महाराणी होण्यास नकार दिला. राजेशाही थाटमाट झुगारून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि ‘नेहरूवादी सत्ते’त येऊन आपला लोकहितवादी चेहरा लोकांना दृढ विश्वासाने दाखवून दिला. राजकुमारी अमृत कौर यांनी स्त्री अस्मिता आणि आत्मसन्मानाचा कायम पुरस्कार केला.

शिमल्यातील राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला तेव्हा व्हॉइल रिगल लॉज संबोधले जायचे. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी १९०९ मध्ये तेथे पार्टीचे आयोजन केले होते. इंग्रज राजवटीची साम्राज्यशाही तेव्हा पार्ट्यांत मनसोक्त हुंदडत होती. त्याला तुम्ही आजची आधुनिकता म्हणू शकता किंवा अपसंस्कृती!

इंग्रज राजवटीने त्या पार्टीत राजकुमारू अमृत कौर यांचे वडिल राजा सर हरनाम सिंहांच्या कुटुंबालाही निमंत्रित केले होते. या पार्टीत सर हरनाम सिंहांसोबत त्यांची मुलगी ( त्यावेळी तिला राजकुमारी हा किताब होता) अमृत कौरही होती. तेव्हा अमृत कौर यांचे वय वीस वर्षांचे. साम्राज्यशाहीतील पार्टीच्या रिवाजानुसार दारू सोबतच नृत्यही होत होते. एका ज्येष्ठ इंग्रज अधिकाऱ्याने राजकुमारी अमृत कौर यांना त्याच्या सोबत नृत्य करण्याचा आग्रह धरला. त्याने वारंवार आग्रह करूनही राजकुमारी अमृत कौर यांनी तीव्र नकार दर्शवला. त्या जेष्ठ अधिकाऱ्या भरमैफलीत खडेबोल सुनावले आणि पार्टीवर बहिष्कार टाकला.

अमृत कौर यांच्या बहिष्कारामुळे ज्येष्ठ इंग्रज अधिकारी लालेलाल झाला. भारतीयांना कधीही स्वातंत्र्य देण्यात येऊ नये, ते खूपच बिघडलेले आहेत, असे तो रागाच्या भरात बडबडला. पार्टीतून बाहेर जाता जाता अमृत कौर यांनी हे ऐकले आणि धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी राजेशाही थाटमाटाला लाथ मारून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार- संपादक खुशवंत सिंह यांनी राजकुमारी अमृत कौर यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला आहे.

जालियनवाला बाग नरसंहारानंतर महात्मा गांधी अमृतसर दौऱ्यावर गेले होते. तेथून ते जालंधरला गेले. तेथे अमृत कौर यांनी त्यांची भेट घेतली आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचा आपला इरादा बोलून दाखवला. अमृत कौर राजघराण्यात वाढलेली मुलगी आहे, हे गांधीजींना चांगले ठावूक होते. त्यावेळी जालंधर कपूरथळा राजघराण्याअंतर्गत येत होते. महात्मा गांधींनी राजकुमारी अमृत कौर यांना सेवाग्राम आश्रमात यायला सांगितले. ते एकापरिने ‘राजकुमारी’ अमृत कौरची परीक्षा घेऊ पाहात होते. अमृत कौर सेवाग्रामला आल्या. तेथे त्यांना हरिजनांची सेवा आणि टॉयलेट बाथरूमच्या साफसफाईचे काम देण्यात आले. त्यांनी हे काम मानवतेची सेवा म्हणून सहजगत्या केलेही. हे पाहून गांधीजींनी अमृत कौर यांना आशीर्वाद दिले आणि तू माझ्या ‘परीक्षे’त उत्तीर्ण झाल्याचे सांगून अमृत कौर यांना स्वातंत्र्य सैनिक संबोधले.

महात्मा गांधींच्या या मान्यतेनंतर राजकुमारी अमृत कौर स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय उतरल्या. त्यांनी सरोजिनी नायडू यांच्यासोबत ऑल इंडिया वुमेन काँग्रेसची विधिवत स्थापना केली. १९४२ मध्ये इंग्रज राजवटीने त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गंभीर खटला भरला आणि त्यांच्यावर कडक निर्बंध लादून त्यांना अंबाला तुरूंगात टाकले. अंबाला तुरूंग त्यावेळी यातना गृह म्हणून कुख्यात होते. अंबाला तुरूंगात अमृत कौर यांची प्रकृती खूपच खालावली. त्यामुळे इंग्रज राजवटीने त्यांना तेथून काढून शिमला येथील मॅनोव्हिर्ल हवेलीत तीन वर्षांसाठी नजरकैदेत ठेवले.

देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारची विधिवत स्थापना झाल्यानंतर अमृत कौर यांना भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री करण्यात आले. दिल्लीतील आखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था म्हणजेच ‘एम्स’ ही अमृत कौर यांनी देशाला दिलेली मोठी देणगी. त्यावेळी अशा विशाल आणि तत्कालीन आधुनिक वैद्यकीय संशोधन संस्थांसाठी पुरेशी तरतूद नव्हती. त्यामुळे त्यांनी देशाबाहेरील उद्योगपती आणि भारत वंशाच्या भांडवलदारांना मदतीचे आवाहन केले. पैसा उभा राहिला आणि एम्स आकाराला आले. एम्समधील ओपीडीला अमृत कौर यांचे नाव दिले गेलेले आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी त्यांनी दिवसरात्र एक केला. शिमल्यात राजेशाहीचा वारसा म्हणून त्यांच्याकडे एक घर होते. ते त्यांनी एम्सचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहासाठी देऊन टाकले होते. अशा या व्यक्तिमत्वाची नोंद जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘टाइम’ नियतकालिने घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा