ट्रेलर झाला, पिक्चर थांबवून दाखवाः अंबानीच्या घराजवळ स्फोटके ठेवणाऱ्या ‘जैश’ची धमकी!

0
412
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या कंबाल हिल भागातील अलिशान घराशेजारी आढळलेल्या स्फोटके भरलेल्या कारची जबाबदारी जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेने स्वीकारली आहे. हा फक्त ट्रेलर होता, अजून मोठा पिक्चर बाकी आहे, तो थांबवून दाखवा, अशी धमकीच जैश उल हिंदने दिली आहे.

गुरूवारी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बहुमजली घरापासून ५०० मीटर अंतरावरील विजय स्टोअरच्या समोरच एक हिरव्या रंगाची बेवारस स्कॉर्पिओ आढळून आली होती. अँटिलियाच्या सुरक्षा रक्षकांना या कारचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एटीएस आणि बॉम्बनाशक पथकाने गाडीची तपासणी केली असता गाडीत जिलेटीनच्या २० कांड्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

ही गाडी कुणी पार्क केली? गाडी पार्क करण्याचा नेमका हेतू काय? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएस तपास करत असतानाच जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेने टेलिग्राम ऍपवर पाठवलेल्या संदेशात या गाडीची जबाबदारी स्वीकारली आहे.

ज्या भावाने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तो सुखरूप घरी परतला आहे. थांबवू शकत असाल तर थांबवण्याचा प्रयत्न करा. हा फक्त ट्रेलर होता. अजून मोठा पिक्चर बाकी आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या नाकाखाली दिल्लीत लक्ष्य केले, तेव्हा तुम्ही काही करू शकला नव्हता. तुम्ही मोसादसोबत हातमिळवणी केली पण काही झाले नाही. तुम्हाला माहीत आहे की काय करायचे आहे. तुम्हाला आधी सांगितले आहे. त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करा आणि तुमच्या फॅट किड्ससोबत आनंदात रहा, असे जैश उल हिंदने या संदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा