जळगावात राजकीय भूकंपः महापौर निवडणुकीपूर्वी भाजपचे ३० नगरसेवक नॉटरिचेबल

0
1300
संग्रहित छायाचित्र.

जळगावः जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या ५७ पैकी ३० नगरसेवक नॉटरिचेबल झाल्यामुळे जळगावात राजकीय भूकंप झाला आहे. भाजपकडून व्हीप बजावला जाण्यापूर्वीच हे नगरसेवक सहलीवर निघून गेल्यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या गोटात सामील झाल्याचे वृत्त असून हा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना जबर धक्का मानला जात आहे.

१८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जळगावच्या महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक होणार आहे. जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी गिरीश महाजन हे रविवारी रात्री भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र त्याआधीच दुपारी दोन वाजेपासून हे ३० नगरसेवक नॉटरिचेबल झाले आहेत. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हे सर्व नगरसेवक शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाऊसवर गोळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेथून ते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येते.

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार व्यूहरचना आखली असून महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचे नाव निश्चित केले आहे. तसा व्हीप शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी काढला आहे. शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपद दिले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. जळगावच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा पहिला कार्यकाळ १७ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. या दोन्ही पदांसाठी सुरूवातीसापासूनच भाजपमध्ये रस्सीखेच होती. मात्र रविवारी दुपारनंतर घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा