अंडरवियर- बनियानवरच आमदार महाशयांनी केला रेल्वे प्रवास, आक्षेप घेणाऱ्या प्रवाशांना शिवीगाळ

0
1285
छायाचित्रः सोशल मीडिया.

पाटणाः लोकांनी मोठ्या अपेक्षा ठेवून आपला लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असतो. परंतु हेच लोकप्रतिनिधी साधनशुचिता सोडून वागू लागले तर? असाच एक धक्कादायक प्रकार काल तेजस एक्सप्रेसमध्ये घडला. राष्ट्रीय जनता दलाचे आमदार गोपाल मंडल हे चक्क अंडरवियर-बनियावर रेल्वे प्रवास करताना दिसले. अंडरवियर-बनियावर रेल्वेच्या मोकळ्या जागेत फिरणाऱ्या या आमदार महाशयांना पाहून काही प्रवाशांनी आक्षेप घेतला खरा, पण त्यांनी भानावर यायचे सोडून उलट त्या प्रवाशांनाच शिवीगाळ केली.

आमदार गोपाल मंडल हे पाटण्याच्या राजेंद्रनगर रेल्वे स्थानकातून तेजस एक्सप्रेसने नवी दिल्लीला निघाले होते. या रेल्वे बोगीतून महिलाही प्रवास करत आहेत, याचे साधे भानही आमदार महाशयांना राहिले नाही. त्यांच्या या अंडरवियर-बनियानवर फिरण्यावर प्रवाशांनी आक्षेप घेतला. रेल्वेतील इतर प्रवासी आणि आमदार गोपाल मंडल यांच्यात त्यावरून जोरदार बाचाबाचीही झाली. ही बाचाबाची इतकी वाढली की, रेल्वेत स्कॉर्ट करणारे आरपीएफचे पथक दाखल झाले. त्यांनी आमदार महाशयांबरोबरच इतर प्रवाश्यांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. पण आमदार महाशय काही ऐकायला तयार झाले नाही.

 पाटण्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या कोच क्रमांक ए-१ मध्ये १३,१४ आणि १५ सीट क्रमांकावरून आमदार गोपाल मंडल आपल्या सहकाऱ्यांसह प्रवास करत होते. तर याच कोचमध्ये २२-२३ क्रमांकाच्या सीटवरून जहानाबादचे प्रल्हाद पासवान आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. या कोचमध्ये काही महिला प्रवाशीही होत्या.

आमदार गोपाल मंडल आपल्या सीटवर कपडे उतरवून केवळ अंडरवियर-बनियानवर बसले होते. कोचच्या मधल्या पॅसेजमधून ते याच अवस्थेत रेल्वेच्या टॉयलेटच्या दिशेने गेले. ते आपल्या सीटवर परत येत असताना प्रल्हाद पासवान यांनी रेल्वे कोचमध्ये महिलाही प्रवास करत आहेत, याची जाणीव करून देत गोपाल मंडल यांच्या या अवस्थेवर आक्षेप घेतला. त्यानंतर अन्य काही प्रवाश्यांनीही आक्षेप घेतले. मात्र आमदार गोपाल मंडल काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी रेल्वे प्रवाश्यांनाच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. हे प्रकरण एवढे वाढले की रेल्वेतील आरपीएफ टीमने पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शनच्या रेल्वे पोलिसांना याची कल्पना दिली. रेल्वे या स्टेशनवर दाखल होताच उत्तर प्रदेशच्या रेल्वे पोलिसांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

आमदार गोपाल मंडल यांच्या अंडरवियर-बनियानवर आक्षेप घेणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांनी पोलिसांत याबद्दल लेखी तक्रार दिली नाही. मात्र गोपाल मंडल यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवल्यानंतर त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले. माझे पोट खराब होते, म्हणून मी अंडरवियर-बनियावर होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आमदार गोपाल मंडल हे भागलपूर जिल्ह्यातील गोपालपूर विधानसभा मतदारसंघाचे जेडीयूचे आमदार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा