औरंगाबादः राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज औरंगाबादेत कोरोनाने एका पत्रकाराचा बळी घेतला. दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते ४९ वर्षांचे होते.
राहुल डोलारे हे मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील होते. सुमारे आठवडाभरापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर आधी चिकलठाण्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र न्यूमोनिया आटोक्यात येत नव्हता. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
राहुल डोलारे यांच्या निधनामुळे औरंगाबादेतील वृत्तपत्रसृष्टीला प्रचंड धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक पत्रकारांनी डोलारे यांचा मृत्यू धक्कादायक आणि वेदनादायी असल्याची शोकमग्न प्रतिक्रिया नोंदवली. उमद्या मनाचा मनमिळावू मित्र अशी राहुल डोलारे यांची ओळख होती.