भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या ‘एक देश, एक भाषा’ घोषणेला भाजप मुख्यमंत्री येडियुरप्पांचा कोलदांडा

1
94

बेंगळुरू : देशावर आलेल्या आर्थिक मंदीच्या संकटामुळे अनेक उद्योग धडाधड बंद पडून हजारो लोक बेरोजगार होत असल्याच्या मुद्द्यावरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उकरून काढलेल्या ‘एक देश, एक भाषा’ मुद्द्याला त्यांच्या स्वपक्षीय भाजपतूनच विरोध होत आहे. भाजपचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीच विरोध केला आहे. देशात सर्व भाषा एकसमान आहेत. कर्नाटकात कन्नड ही प्रमुख भाषा आहे. आम्ही कन्नड भाषेशी कधीच तडजोड करणार नाही.’ असे ट्विट करून येडियुरप्पा यांनी शाह यांच्या भूमिकेलाच आव्हान दिले आहे.

हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी ‘एक देश, एक भाषे’चा नारा देताना हिंदी ही भाषा देशाला एकत्र आणू शकते, असे सांगत हिंदी ही देशाची एकच राष्ट्रभाषा म्हणून या भाषेला प्रोत्साहन देण्याची योजना बोलून दाखवली होती. शाह यांच्या या विधानावर दक्षिण भारतातून लगेच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  अभिनयाच्या क्षेत्रातून सक्रीय राजकारणात उतरलेले मक्कल निधी मैयम पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनीही सोमवारी एक व्हिडीओ जारी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला होता. ‘भारतात 1950 मध्ये विविधतेत एकतेचे आश्वासन देऊन संघराज्य स्थापन झाले आहे. आता कोणी शाह, सुल्तान किंवा सम्राट ते नाकारू शकत नाही. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो पण आमची मातृभाषा नेहमीच तामीळच राहील. तिला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा एकदा भाषेसाठी आंदोलन होईल आमि ते जल्लीकट्टू आंदोलनापेक्षाही मोठे असेल. तामिळनाडूला अशा लढाईची गरज आहे’, असा इशाराच दिला होता. डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनीही केंद्र सरकारवर टीका करत बळजबरीने हिंदी भाषा थोपवण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्यात आता येडियुरप्पा यांची भर पडली आहे. येडियुरप्पा यांनी केलेल्या व्टिटमध्ये ‘कन्नड भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,’ असे सांत शाह यांच्या भूमिकेलाच आव्हान देण्यात आले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा