काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्यासाठी दिली होती पैशांची ऑफरः कर्नाटकच्या भाजप आमदाराचा दावा

0
465
संग्रहित छायाचित्र.

बेंगळुरूः कर्नाटकातील काँग्रेस- जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार झाला होता का? या मुद्यावरून आता नव्याने वाद होण्याची चिन्हे आहेत. एका भाजप आमदारानेच केलेल्या दाव्यामुळे या वादाला फोडणी मिळू शकते. कर्नाटकातील काँग्रेस- जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी मला काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. तेव्हा मी काँग्रेसचा नेता होतो, असा दावा खळबळजनक भाजप आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.

 जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे  कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले होते. तत्पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला होता. काँग्रेस- जेडीएसने सरकार स्थापन केले होते. हे सरकार पाडून आपले सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने कर्नाटकमध्ये ‘ऑपरेश लोटस’ चालवले होते आणि काँग्रेस- जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस- जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले आणि बीएस. येद्दियुरप्पा मुख्यमंत्री झाले होते.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 या राजकीय घटनाक्रमाला आता दोन वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. येद्दियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले आणि बसवराज मोम्बई यांना मुख्यमंत्री करण्यात आले. या सगळ्या वादावर पडदा पडत असतानाच भाजप आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल होण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

मी पैसे न घेता भाजपमध्ये प्रवेश केला. मला भाजपमध्ये दाखल होण्यासाठी पैसे देऊ केले होते. मला हवे तेवढे पैसे मी मागू शकलो असतो. मी पैसे मागितले नाही तर लोकांची सेवा करण्यासाठी मंत्रिपद मागितले, असे श्रीमंत बाळासाहेब पाटील म्हणाले. विद्यमान सरकारमध्ये मला मंत्रिपद का दिले गेले नाही, हे मला माहीत नाही. परंतु पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मला एक मंत्रिपद मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवरा बोम्बई यांच्याशी माझी चर्चा झाली आहे, असेही पाटील म्हणाले.

श्रीमंत बाळासाहेब पाटील हे कर्नाटकच्या कागवाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये होते. परंतु जुलै २०१९ मध्ये त्यांनी पक्ष बदलला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-जेडीएस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १६ आमदारांत श्रीमंत बाळासाहेब पाटील यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासूनच सुरू झाले आहे. अशात पाटील यांचे हे वक्तव्य आल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा