कोरेगाव-भीमात शौर्यदिनी जनसागर लोटला, प्रकाश आंबेडकर, अजितदादांचे विजयस्तंभाला अभिवादन

0
116

पुणे कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदाही देशभरातून लाखो अनुयायी जमले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे.

शहरात ४०० पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी, होमगार्ड पहारा देत आहेत. सोशल मीडियावरील अफवांमुळे वातावरण बिघडू नये म्हणून २५० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर पेरणे गावाच्या हद्दीत होर्डिंग लावण्यास मनाई करण्यात आली आहे. ७४० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी त्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन करत प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेवरही समाधान व्यक्त केले. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आज गर्दी होणार असल्याने कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. चार तालुक्यांत जमावबंदीचे लागू केली आहे. वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी १५ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे- नगर रस्ता बुधवारी वाहतुकीस बंद ठेवला आहे. मुंबई आणि नाशिकहून येणाऱ्या वाहनांना परत जाताना तुळापूर, मरकळ, आळंदी या मार्गे जावे लागणार आहे. सोलापूर, पुणे, सातारा यामार्गे येणारी वाहने ही येताना वाघोलीमार्गे येतील; परंतु, जाताना लोणीकंद, केसनंद, देहू फाटामार्गे सोलापूर महामार्गाकडे जाऊ शकतील.

दंगलीचा डाव उधळलाः प्रकाश आंबेडकर : राज्यात सत्ता बदलल्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोकांचा भीमा कोरेगाव येथे दंगल घडवण्याचा डाव होता. आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून हा डाव उधळून लावला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नकाः अजित पवार : अफवांवर विश्वास ठेवू नका. जातीय सलोखा राखण्याची आपली परंपरा आहे. ही परंपरा कायम राखा आणि शांतता ठेवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा