औरंगाबादः औरंगाबाद शहरातील सिडको एन-1 भागातील काळा गणपती मंदिर परिसरात शिरलेल्या बिबट्याला सहा तास अथक प्रयत्न केल्यानंतर जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
मंगळवारी सकाळी या भागातील नागरिक सिडको एन-1 भागातील काळा गणपती मंदिर परिसरात असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर फिरायला गेले असताना त्यांना हा बिबट्या दिसला होता. बिबट्या पाहताच नागरिकांनी तेथून पळ काढला आणि ही माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना दिली. वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा फौजफाटाही दाखल झाला. लोकांची गर्दी वाढल्यामुळे बिथरलेला बिबट्या एका घरात लपून बसला होता. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली होती. अखेर दुपारी अडीच- पावणेतीन वाजेच्या सुमारास या बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
वन विभागाचे कर्मचारी कायमच गाफील
सिडको परिसरातील बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आले खरे परंतु बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागणारी बंदूकच सोबत आणायला ते विसरले. बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यासाठी लागणारी बंदूक कन्नडच्या गौताळा अभायरण्यात होती. औरंगाबाद ते कन्नड हे अंतर जवळपास 60 किलोमीटर आहे. त्यामुळे तेथून बंदूक येईपर्यंत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यापूर्वीही वन विभागाचे कार्यालय असलेल्या परिसरात बिबट्या आढळला होता. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी व्हॉलीबॉलची नेट घेऊन धावले होते.
व्हिडीओ पहा :