चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

0
846
प्रातिनिधिक छायाचित्र.

स्फूर्ती ही पारंपारिक उद्योगांच्या पुनर्निर्मितीसाठी निधीची योजना आहे. भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) २००५ मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.  हा केंद्र सरकारच्या अनुदानाचा एक प्रकार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे लक्षात घेता मार्च २०२० मध्ये या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करून सुटसुटीतपणा आणण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आता सुक्ष्म आणि लघु उद्योग क्लस्टर विकास कार्यक्रमाला (सीडीपी) निधी उपलब्ध करून देण्यात येते.

स्फूर्ती योजनेची उद्दिष्टेः

  • पारंपरिक उद्योग आणि कारागिरांना क्लस्टरमध्ये संघटित करून त्यांना स्पर्धात्मक बनवणे आणि दीर्घकालीन स्थैर्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
  • पारंपरिक उद्योगातील कारागीर आणि ग्रामीण उद्योजकांना शाश्वत रोजगार प्रदान करणे.
  • नवीन उत्पादने, डिझाइन इंटर्व्हेन्शन आणि सुधारित पॅकेजिंगसह अत्याधुनिक मार्केटिंग सुविधा प्रदान करून अशा क्लस्टर्सची विपणन क्षमता वाढवणे.
  • संबंधित क्लस्टरच्या कारागिरांना प्रशिक्षण आणि भेटीद्वारे उन्नत कौशल्य आणि क्षमता प्रदान करणे.
  • पायाभूत सुविधांच्या इष्टतम वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कारागिरांसाठी सामान्य सुविधा आणि सुधारित साधने आणि उपकरणे यासाठी तरतूद करणे.
  • नवीन आणि पारंपारिक कौशल्ये, सुधारित तंत्रज्ञान, प्रगत प्रक्रिया, बाजार बुद्धिमत्ता आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे नवीन मॉडेल तयार करणे, जेणेकरून क्लस्टर-आधारित पुनर्निर्मित पारंपारिक उद्योगांच्या समान मॉडेलची हळूहळू पुनरावृत्ती होईल. इत्यादी.

कोणत्या प्रकारच्या व्यवसायांना परवानगी आहे?:  स्फूर्ती योजनेअंतर्गत दुग्धशाळा, हातमाग, मधमाशी क्लस्टर, कृषी उत्पादन-उत्पादक यूनिट, कुटीर उद्योग. डाळी आणि तृणधान्ये प्रक्रिया उद्योग, फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, ग्राम तेल उद्योग, कॉटेज चर्मउद्योग, प्लास्टिक उद्योग इत्यादी.

कशाची आवश्यकता आहे?: या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी गोष्टींची आवश्यकता आहे.

  • शेतकरी उत्पादक कंपनी (Farmer Producer Company) किंवा कंपनी कायद्याच्या कलम ८ नुसार नोंदणी केलेली कंपनी यासारखी नोंदणीकृत संस्था.
  • गेल्या तीन वर्षांपासून अंमलबजावणी संस्था म्हणून स्वयंसेवी संस्था.
  • स्वतःची जमीन.

योजना अनुदान रक्कम?:

कंपनीशी संलग्न सदस्य किंवा कारागीरांच्या संख्येवर  या योजनेच्या अर्थ सहाय्य व अनुदानाची रक्कम अवलंबून असते.  ही रक्कम २.५ ते ५ कोटी दरम्यान  आहे.

कालावधीः स्फूर्ती योजनेअंतर्गत प्रकल्प प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यासाठी सुमारे ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागतो.

स्फूर्ती योजनेअंतर्गत प्रकल्प टाकू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती/ संस्था सविस्तर माहिती आणि प्रकल्प अहवालासाठी चेतन भुतडा यांच्याशी  +918855098984 या क्रमांकावर न्यूजटाऊनचा संदर्भ देऊन संपर्क साधू शकतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा