बिहारच्या जागा वाटपावरून एनडीएत फाटाफुटीची चिन्हे, जदयूविरोधात लढण्याचा लोजपाचा इशारा

0
452
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारने आणलेल्या तीन नवीन कृषी विधेयकांमुळे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमधून २२ वर्षे जुना घटक पक्ष शिरोमणी अकाली दल बाहेर पडलेला असतानाच आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरूनही एनडीएमध्ये फाटाफुटीची चिन्हे दिसू लागली आहेत. लोक जनशक्ती पार्टीला (लोजपा) ३३ जागा न दिल्यास नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराच चिराग पासवान यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

एनडीएचा घटक पक्ष आणि मोदी सरकारमधील भागीदार असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहूनच हा इशारा दिला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत लोजपाला ३३ जागा आणि राज्यपाल नियुक्त दोन जागा द्याव्यात, अशी मागणी पासवान यांनी केली आहे. अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर जदयूविरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही पासवान यांनी या पत्रात दिला आहे.

यापूर्वीही चिराग पासवान यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या विरोधात वातावरण असल्याचे सांगितले होते. लोजपाला राज्यसभेची एक जागाही त्यांनी यावेळी मागितली होती. ही जागा न दिल्यास बिहार विधानसभेचे जागा वाटप करतानाच बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार लोजपातून चिराग पासवान यांना उपमुख्यमंत्रिपद जाहीर करावे, असे असा फॉर्म्युलाही पासवान यांनी दिला होता.

भाजपकडून दुर्लक्षित केले जात असल्यामुळे आधीच एनडीएचे घटक पक्ष नाराज आहेत. या नाराजीतूनच तेलगू देशम आणि शिवसेना हे दोन घटक पक्ष एनडीएतून बाहेर पडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी कृषी विधेयकांच्या मुद्यांवर शिरोमणी अकाली दलही एनडीएतून बाहेर पडला आहे. आता जागावाटपाच्या मुद्यावरून लोजपाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा